वैद्यकीय महाविद्यालय नामंजूरचंद्रपूर : चंद्रपुरात स्थापन होऊ घातलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासह राज्यातील सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यायांची परवानगी नाकारण्याचा मुद्दा तापायला लागला आहे. राज्यात व केंद्रात सत्तेत असणाऱ्या सरकारमधील भाजपा नेत्यांच्या कद्रू मानसिकतेतून या महाविद्यालयांची परवानगी नाकारल्याचा आरोप काँग्रेसचे माजी खासदार नरेश पुगलिया यांनी केला असून ही संकुचित भावना सोडावी, असा उपरोधिक सल्लाही दिला आहे.तर, दुसरीकडे भाजपानेही पुगलियांच्या वक्तव्यावर प्रत्यूत्तर दिले आहे. काँग्रेसने विकासच्या मुद्यावरील खोटे राजकारण बंद करावे, असा सल्ला पत्रकातून दिला आहे.२०१५-१६ या शैक्षणिक सत्रामध्ये सुरू होणाऱ्या राज्यातील सहा प्रस्तावित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांची परवानगी केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने नाकारली आहे. यात चंद्रपूर, गोंदिया, सातारा, बारामती, नंदूरबार आणि अलिबाग ही सहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालये आणि सांगली येथील खाजगी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाने या महाविद्यायांची यादी १५ जूनला र्इंटरनेटवर उपलब्ध करून दिली आहे.या संदर्भात बुधवारी सायंकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेसचे नेते नरेश पुगलिया यांनी भाजपा नेत्यांवर आरोप केले. ते म्हणाले, ही सर्व वैद्यकीय महाविद्यालये मागच्या आघाडी सरकारच्या काळातील प्रस्तावित होती. त्यामुळे भाजपा सरकारने मुद्दामच परवानगी नाकारली आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकार जबाबदार असल्याचा आरोप करून ते म्हणाले, मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांनी संकुचितपणा न ठेवता या सर्व महाविद्यालयांना परवानगी द्यायला हवी होती. यामुळे राज्यातील ६०० विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले असून गरीब जनता आरोग्यसेवेला मुकली आहे. यातून भाजपाचा खरा चेहरा पुढे आला आहे. ‘काँग्रेसचे उष्टे आम्ही खात नाही’, असे वक्तव्य भाजपा आणि त्यांच्या सरकारातील मंडळींकडून निघत आहेत. अशा भेदभावाची अपेक्षा नव्हती. हा जनतेशी विश्वासघात असल्याने याचा आपण निषेध करतो, असे ते म्हणाले.वैद्यकीय महाविद्यालयाच्या मुद्यावरून काँग्रेसच्या नेत्यांनी खोटेपणा करू नये. ‘काँग्रेसचे उष्टे आम्ही खात नाही’ असे आपण कधीच म्हटले नाही. कपोलकल्पित बोलणे या नेत्यांनी टाळावे. चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विरोधात आपण असतो तर या महाविद्यालयाच्या पूर्ततेसाठी अधिकाऱ्यांशी बैठका घेतल्या नसत्या. डिसेंबरमधील अधिवेशनात १७ कोटी रूपये दिले नसते. आम्ही विकासाचे राजकारण करतो. -सुधीर मुनगंटीवार, वित्तमंत्री
वातावरण तापले
By admin | Updated: June 18, 2015 01:10 IST