चंदनखेडा : अच्छे दिनच्या नावाखाली पंतप्रधान नरेंद्र मोदी निवडून आले, मात्र आम जनतेला वाईटच दिवस पहावयास मिळत आहे. साठ हजार कोटी रुपये खर्च करून बुलेट ट्रेन चालू करणार तेव्हा ही कोणासाठी. या देशातल्या श्रीमंत आणि व्यापाऱ्यांचीच मोदी सरकारला चिंता आहे. भांडवलदार वर्गाचे सरकार गरिबांना न्याय देणार नाही. याकरिताच आपण राजकारण शिखले पाहिजे. आशा वर्करच्या मागण्या अद्यापही पूर्ण केल्या नसल्याने आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही, असे मत प्रा. दहीवडे यांनी व्यक्त केले.आशा वर्कर संघटनेचा मेळावा चंदनखेडा येथे घेण्यात आला. यावेळी ते बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून माला बागेसर, संगिता गोरे, सिमा सुखदेवे आदी उपस्थित होते. याप्रसंगी सुचिता काळे म्हणाल्या, वाढत्या महागाईची जाणीव शासनाला आहे. या महागाईच्या नावाखालीच माजी आमदाराच्या पेंशनमध्ये १५ हजार रुपयाने वाढ करून ती वाढविण्यात आली. आमदाराचे सारे भत्ते दुप्पट करण्यात आले. गोरगरीब जनतेचे नाव घेऊन निवडून आलेल्या शासनकर्त्यांना आशा वर्कर मात्र दिसल्या नाही.सहा वर्षांपासून मिटींग भत्ता १५० रुपये आहे. यात वाढ करण्यात आली नाही. अन्य कामाच्या मोबदल्यात देखील वाढ करण्यात आली नाही. आभार किशोरी तालेवार यांनी मानले. यावेळी संगिता दहेकर, संगिता जिवतोडे, योगिता गंधारे, सुनिता दडमल, सुनिता ठमके, आदी उपस्थित होत्या. (वार्ताहर)
आशा वर्करचा असंतोष; रस्त्यावर उतरणार
By admin | Updated: July 27, 2014 00:02 IST