सावली : वन्यजीव संरक्षणाच्या जनजागृतीसाठी सुरू असलेल्या पक्षी सप्ताहातच दुर्मीळ पक्ष्यांची अमानुष शिकार केल्याचा धक्कादायक प्रकार सावली वनपरिक्षेत्रात उघडकीस आला आहे. व्याहाड उपवनक्षेत्रातील मौजा उमरी लगतच्या तलावात रेशाळ कंठाची भिंगरी (Streak-throated Swallow) या संरक्षित प्रजातीच्या पक्ष्यांची शिकार करणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील चार शिकाऱ्यांना सावली वनविभागाने मुद्देमालासह रंगेहात अटक केली आहे.
लोमेश धोंडू गेडाम (३४), प्रताप बालाजी जराते (४५), अरविंद धोंडू गेडाम (३३), मुखरू सखाराम मेश्राम (६५) सर्व रा. पारडी, ता. जि. गडचिरोली असे अटकेतील आरोपींचे नाव आहेत.
पद्मश्री स्व. मारोती चितमपल्ली आणि पक्षीतज्ञ डॉ. सलीम अली यांच्या जयंतीनिमित्त देशभर ५ ते १२ नोव्हेंबरपर्यंत पक्षी सप्ताह साजरा जातो. अशातच शिकाऱ्यांनी दुर्मिळ पक्षाची बेकायदा कत्तल केल्याने वनविभागात संतापाचे वातावरण आहे.
दि. ७ नोव्हेंबर रोजी पहाटेच्या सुमारास उमरी तलाव परिसरात वनकर्मचारी पक्षीनिरीक्षण करीत असताना, संशयास्पद हालचाल दिसल्याने कारवाई करण्यात आली. वनपथकाने घटनास्थळी धडक देताच शिकारींनी पकडलेल्या पक्ष्यांचा मोठा साठा आढळला. वनविभागाने मुद्देमालांसह चौघालाही ताब्यात घेऊन वन्यजीव (संरक्षण) अधिनियम १९७२ च्या कलम ९, ३९, ४९, ५०, ५१ अन्वये गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास विभागीय वन अधिकारी राजन तलमले, सहायक वनसंरक्षक विकास तरसे यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे करीत आहेत.
जाळी, नायलॉन दोरीसह शिकारीचे साहित्य जप्त
वनविभागाने शिकाऱ्यांकडून शिकारीसाठी वापरलेली जाळी ८ नग, थैली ५, नायलॉन दोरीचे ९ बंडल, बांबू काठ्या १६, लाकडी खुंट्या ८, दोन मोटारसायकली (एमएच ३३ एक्स ०११३,एमएच ३३ एल ३१६५) क्रमांकाच्या दोन दुचाकी व २२५ मृत पक्षी असा मोठा मुद्देमाल केला. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी विनोद धुर्वे, वनक्षेत्र सहायक अनंत राखुंडे, वनरक्षक महादेव मुंडे, भोलेश्वर सोनेकर, एकनाथ खुडे, आर.एस. डांगे तसेच स्थानिक पीआरटी चमू व बिट मदतनीस यांच्या संयुक्त पथकाने केली.
Web Summary : During Bird Week, a shocking incident occurred in Savli, where four poachers from Gadchiroli were arrested for hunting 225 protected Streak-throated Swallows. The forest department seized nets, nylon ropes, and motorcycles used in the illegal activity. An investigation is underway.
Web Summary : सावली में पक्षी सप्ताह के दौरान एक चौंकाने वाली घटना में, गडचिरोली के चार शिकारियों को 225 संरक्षित धारीदार गले वाले अबाबील का शिकार करने के आरोप में गिरफ्तार किया गया। वन विभाग ने अवैध गतिविधि में इस्तेमाल किए गए जाल, नायलॉन की रस्सियाँ और मोटरसाइकिलें जब्त कीं। जांच जारी है।