दुर्गापूर गावात एक पाण्याची टाकी आहे. टाकीत पाणी पुरवठा करणारी जलवाहिनी पद्मापूर कोळसा खाणीच्या कार्यालयाजवळून आली आहे. सदर जलवाहिनीच्या एअर व्हॉल्व्हला हेतुपुरस्पर छेडछाड करून तो जास्त उघडण्यात आला आहे. यातून निघणार्या अतिरिक्त पाण्याची चोरी कंत्राटदारामार्फत छुप्या पद्धतीने केली जात असल्याने येथील नागरिकांना पाण्यासाठी चांगलीच पायपीट करावी लागत आहे. दुर्गापूर गावाला पाणी पुरवठा करणारी ६ लाख २४ हजार लीटर क्षमतेची येथे एक मोठी पाण्याची टाकी आहे. येथून १0 किलोमीटर अंतरावर आंबोरा गाव आहे. यालगत एक विहीर खणण्यात आली आहे. येथून पाणी टाकीपर्यंत वाहून नेण्याकरिता जलवाहिनी टाकण्यात आली आहे. या जलवाहिनीवर ठिकठिकाणी उंच एअर व्हॉल्व्हस बसविले आहेत. यातून हवेसह काही प्रमाणात पाण्याचे फवारे वर उडत असतात. मात्र चंद्रपूर - ताडोबा मार्गावर असलेल्या पद्मापूर कोळसा खाणीच्या उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या कार्यालयाजवळ असाच एक एअर व्हॉल्व्ह आहे. सदर व्हॉल्व्हला काही जणांनी हेतुपुरस्पर छेडछाड करून तो अधिक उघडला आहे. त्यामुळे त्यातून धो-धो पाणी खाली पडत आहे. या पाण्याला साठविण्याकरिता चार फुट रूंद व लांब व एक फुट उंच आकाराची टँक बसविली आहे. व्हॉल्व्हमधून अतिरिक्त निघणारे पाणी यात साचते. याच टँकला एका बाजुने छीद्र पाडून पाईप बसविण्यात आला आहे. हा पाईप लगतच्या असलेल्या एका पडित विहीरीला जोडण्यात आला आहे. याद्वारे हे पाणी विहिरीत साठविले जाते. पायथ्याशी एक मोटरपंप बसविण्यात आला आहे. तो कोणालाही दिसणार नाही, अशा पद्धतीने लपवून ठेवण्यात आला आहे. पंपद्वारे विहिरीतील पाणी ओढून छुप्या पद्धतीने उपक्षेत्रीय प्रबंधकाच्या भिंतीला भगदाड पाडून आत नेण्यात येत आहे. नंतर हे पाणी गार्डन मेन्टनन्सचा कंत्राट मिळालेला एक कंत्राटदार त्या आवारात असलेल्या गार्डनकरिता बिनधास्त वापर करीत आहे. यासारखेच दुसर्या बाजुनेही टँकला पाईप बसविला आहे. हा पाईप लगतच्या असलेल्या कोळसा खाणीच्या कार्यशाळेच्या आवारात गेला आहे. तेथे या पाण्याचा सर्रास वापर केला जात आहे. मात्र हे पाणी कशाकरिता उपयोगात आणल्या जात आहे हे कळू शकले नाही. या सर्व प्रकारामुळे मात्र नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.
पाण्याच्या चोरीमुळे कृत्रिम टंचाई
By admin | Updated: June 2, 2014 01:03 IST