लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वीजबिलाचा भरणा करण्यासाठी दिलेल्या धनादेशाचा कोणत्याही कारणामुळे अनादर (चेक बाउन्स) झाल्यास बिलासाठी ७५० रुपये बैंक अॅडमिनिस्ट्रेशन चार्जेस व त्यावरील १८ टक्के जीएसटी १३५ रुपये असे एकूण ८८५ रुपये आणि विलंब आकार पुढील महिन्याच्या वीजबिलात इतर आकार म्हणून समाविष्ट करण्यात येतो. याशिवाय ग्राहकाची धनादेशाद्वारे वीजबिल भरण्याची सुविधा काही काळ खंडित होते. ग्राहकांनी धनादेशाऐवजी ऑनलाइन वीजबिल भरावे आणि संभाव्य त्रास टाळणे सोयीचे आहे.
वीजबिल भरण्यासाठी ऑनलाइन, ईसीएस, एनईएफटी, आरटीजीएस असे विविध पर्याय उपलब्ध आहेत. तरीही काही वीज ग्राहक धनादेशाद्वारे वीजबिल भरत आहेत. पण, तो बाउन्स होण्याचे प्रमाण वाढले. चेकवर चुकीची तारीख लिहिणे, खाडाखोड केल्यावर हस्ताक्षर न करणे, चुकीचे हस्ताक्षर करणे, खात्यामध्ये पुरेशी रक्कम नसणे आदी चेक बाउन्सची कारणे आहेत. चेक दिल्यावर पावती मिळत असली तरी चेक क्लिअर झाल्यावरच भरणा होतो. त्यामुळे बाऊन्स होण्याची शक्यता असते.
दंडासह अतिरिक्त शुल्कवीजबिल भरण्यासाठी अनेक पर्याय आहेत. तरीही चेक वापरले जातात. तर चेक बाउन्स झाल्यास प्रत्येक बिलात १८ टक्के जीएसटीसह ८८५ रुपयांचा दंड आकारला जातो. याबाबत ग्राहकांना सतर्क केले आहे.
चेक जमा करण्यासाठी चार दिवसांची मुदतवीजबिल भरण्याच्या अंतिम मुदतीपूर्वी दिलेला धनादेश वटणे आवश्यक असते. त्यानंतरच बिलाची रक्कम प्राप्त झाल्याची नोंद होते.अनेक वीजग्राहक अंतिम मुदतीच्या एक-दोन दिवसांपूर्वी धनादेशाद्वारे वीजबिलाची रक्कम भरतात. धनादेश वटण्यास साधारणतः दोन ते तीन दिवसांचा कालावधी लागू शकतो.