ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्त्या रखडल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2017 12:36 AM2017-07-23T00:36:28+5:302017-07-23T00:36:28+5:30

गावातील विद्युत व्यवस्थेत निर्माण होणाऱ्या गावातच निपटारा व्हावा, यासाठी ग्रामपंचायतीद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या...

Appointment of village administrative managers | ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्त्या रखडल्या

ग्राम विद्युत व्यवस्थापकांच्या नियुक्त्या रखडल्या

googlenewsNext

वरिष्ठांकडून दिरंगाई : अर्जदारांची तगमग वाढली
घनश्याम नवघडे । लोकमत न्यूज नेटवर्क
नागभीड : गावातील विद्युत व्यवस्थेत निर्माण होणाऱ्या गावातच निपटारा व्हावा, यासाठी ग्रामपंचायतीद्वारे प्रस्तावित करण्यात आलेल्या ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या अद्यापही रखडल्या आहेत. नियुक्त्या रखडत चालल्याने या गावी विद्युत व्यवस्थापकांची तगमग चांगलीच वाढत आहे.
महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने २० आॅक्टोबर २०१६ रोजी क्रमांक व्हीपीएम प्र.क्र. ८/ पं.स. ३ अन्वये एक आदेश निर्गमित करुन प्रत्येक गावात ग्रामविद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्त्या कराव्यात, असे ग्रामपंचायतींना सूचविले होते. या आदेशानुसार ग्रामपंचायतींनी जाहिरातीद्वारे उमेदवारांचे अर्ज मागविले होते. उमेदवारांचे अर्ज मागविल्यानंतर योग्य उमेदवारांची निवड करुन त्याची शिफारस वीज वितरण कंपनीकडे केली होती.
या प्रक्रियेला आता सहा ते आठ महिन्यांचा कालावधी होत आहे. नागभीड तालुक्यापुरते बोलावयाचे झाल्यास नागभीड तालुक्यातील ग्रामपंचायतींनी ही प्रक्रिया जानेवारी- फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात राबविली आणि उमेदवारांच्या निवडीची शिफारस लगेच विद्युत वितरण कंपनीला कळविली. नागभीडच्या वीज वितरण कार्यालयाने आलेल्या या सर्व शिफारसी संकलित करुन गडचिरोली येथील विभागीय कार्यालयाकडे मंजुरीसाठी पाठविल्या आहे, अशी माहिती आहे.
शिफारशी मागे-पुढे गेल्या असल्या तरी काही शिफारशींना आता पाच ते सहा महिन्यांचा कालावधी झाला आहे. गावातच नोकरी मिळणार, या आशेने अर्ज केलेले आहे. विद्युत व्यवस्थापक नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
पण या नियुक्त्या दिवसेंदिवस रखडत चालल्या आहेत. नागभीड तालुक्यात ५६ ग्रामपंचायती आहेत. या संपूर्ण ग्रामपंचायतींनी ही प्रक्रिया राबविली आहे. पण संपूर्ण नियुक्त्या रखडल्या असून अर्जदार ग्रामपंचायत आणि ग्रामसेवकांना यासंदर्भात वारंवार विचारणा करीत आहेत. एकंदर या प्रकारामुळे विद्युत व्यवस्थापकांची नियुक्तीबाबतची तगमग चांगलीच शिगेला पोचत आहे.
सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने या दिवसात विजेचा प्रश्न नेहमीच गंभीर रुप घेत असतो. या समस्येच्या निवारणासाठी ग्राम विद्युत व्यवस्थापकाची नियुक्ती होणे अत्यंत गरजेचे असून याकडे वरिष्ठांनी गांभीर्याने बघावे, अशी अपेक्षा आहे.

Web Title: Appointment of village administrative managers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.