आनंदवन जिल्हा परिषद शाळेत अडीच लाखांच्या साहित्याची चोरी
वरोरा : आनंदवन येथील जिल्हा परिषद शाळेत संगणक साहित्य असलेल्या कक्षाच्या लोखंडी खिडकीचे गज कापून अज्ञात चोरट्यांनी संगणक प्रिंटर यासह दोन लाख पन्नास हजार रुपयाचे साहित्य चोरून नेले. ही घटना २७ डिसेंबरच्या रात्री घडली. २८ डिसेंबरला ही घटना मुख्याध्यापक व शिक्षकांच्या लक्षात आल्याने याबाबत वरोरा पोलिसात तक्रार नोंदविण्यात आली आहे. जिल्हा परिषद शाळा आनंदवन येथील इमारतीत संगणक साहित्य असलेला स्वतंत्र कक्ष आहे. या कक्षाच्या मागील बाजूस असलेल्या खिडकीचे लोखंडी गज कापून अज्ञात चोरट्यांनी संगणक कक्षातील एक संगणक, तीन लर्निंग प्रोजेक्टर, एक लेझर प्रिंटर, डॉट मॅट्रीक्स प्रिंटर, दोन किबोर्ड माऊस, १२ स्पीकर असे दोन लाख पन्नास हजार रुपयाचे साहित्य लंपास केले. २६ व २७ डिसेंबरच्या रात्री चोरी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. २८ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता संगणक कक्षात चोरी झाल्याचे उघडकीस आल्याने शाळेच्या मुख्याध्यापिका गीता पांडे यांनी वरोरा पोलिसात तक्रार केली. सध्या सर्वच शाळांमध्ये संगणकीकरण झाले असून मुलांना शिकण्याकरिता लाखो रुपयाचे साहित्य शासन तसेच शाळा लोक सहभागातून मिळवीत असतात. अशा प्रकारच्या साहित्यावर अलीकडच्या काळात चोरट्यांनी आपली नजर फिरवीत शाळेतील संगणक साहित्याच्या चोऱ्या करीत आहे. पोलिसांसमोर चोरट्यांने पकडण्याचे आवाहन असून चोरीचा छळा लावण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी)