मूल : तालुक्यातील आकापूर जवळील एमआयडीसी परिसरात उभारण्यात आलेल्या राजुरी स्टील अॅन्ड अलाय लिमीटेड या कंपनी प्रशासनाने सहाय्यक कामगार आयुक्तांच्या समक्ष झालेल्या त्रिपक्षीय कराराचे उल्लंघन केल्यामुळे कंपनी प्रशासनाच्या विरूद्ध कामगारांनी राष्ट्रवादी जनरल कामगार संघाचे तालुकाध्यक्ष सुमित समर्थ यांच्या नेतृत्वात १६ आॅगस्टपासून आमरण उपोषण सुरू केले आहे.राजुरी स्टील अॅन्ड अलाय लिमीटेड कंपनी ही मागील दोन वर्षांपासून उत्पादन घेत आहे. कंपनी ज्या कामगारांचा वापर करून उत्पादन घेत आहे, त्याच कामगारांनी विविध सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी कंपनीकडे केली होती. मात्र कोणतीही पुर्वसूचना न देता तसेच वेतन न देता १४ मे रोजी मागणी करणाऱ्या कामगारांना कामावरून कमी केले. झालेल्या अन्यायाविरूद्ध कामगारांनी राष्ट्रवादी जनरल कामगार संघटनेचे अध्यक्ष सुमित समर्थ यांच्याकडे तक्रार केली. तक्रारीच्या अनुषंगाने समर्थ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य व राष्ट्रवादी जनरल कामगार संघाचे विदर्भ प्रांत अध्यक्ष प्रमोद मोहोड यांच्याकडे पाठपुरावा केला. याबाबत चंद्रपूर येथील सहाय्यक कामगार आयुक्तांकडे कंपनी प्रशासनाविरुद्ध तक्रार करण्यात आली. कामगारांच्या मागण्याविषयी सहाय्यक कामगार आयुक्तांनी १० जूनला त्रिपक्षीय बैठक बोलावून कामगारांच्या मागण्याबाबत करारनामा तयार करण्यात आला. करारनामा तयार करताना कंपनीच्या अधिकाऱ्यांनी स्वाक्षरी करून मंजुरी दिली. परंतु करारनाम्याची अंमलबजावणी कंपनी प्रशासनाकडून होत नसल्यामुळे १६ आॅगस्टपासून कंपनी प्रशासनाविरूद्धात कामगारांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.यासंदर्भात कामगारांच्या न्याय मागण्यासाठी कामगार नेते प्रमोद मोहोड, सुमित समर्थ यांनी राज्याचे कामगार मंत्री भास्कर जाधव यांना भेटून त्यांचे या समस्येकडे लक्ष वेधले. त्यावेळी ना. जाधव यांनी २३ जुलैला मंत्रालयात व्यवस्थापन, कामगार नेते व आयुक्तांची बैठक आयोजित केली मात्र यावेळी कंपनीचे अधिकारी गैरहजर होते. कामगारांना न्याय मिळावा यासाठी कंपनी प्रशासनाविरोधात आमरण उपोषण सुरू असून जोपर्यंत कामावर घेत नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा निर्धार कामगारांनी व्यक्त केला आहे. (तालुका प्रतिनिधी)
राजुरी स्टील कंपनी प्रशासनाविरूद्ध आमरण उपोषण
By admin | Updated: August 18, 2014 23:24 IST