तांत्रिक कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत

By Admin | Updated: April 17, 2016 00:36 IST2016-04-17T00:36:22+5:302016-04-17T00:36:22+5:30

विद्युत कंपनीमध्ये काम करणाऱ्या तांत्रिक कामगारांचे प्रश्न व मागण्या न्याय्य असून त्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही ...

All help to solve the problems of technical workers | तांत्रिक कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत

तांत्रिक कामगारांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी मदत

सुधीर मुनगंटीवार : तांत्रिक कामगार युनियनचा मेळावा
चंद्रपूर : विद्युत कंपनीमध्ये काम करणाऱ्या तांत्रिक कामगारांचे प्रश्न व मागण्या न्याय्य असून त्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याची ग्वाही पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. दाताळा रोडवरील लॉनमध्ये आयोजित विद्युत क्षेत्र तांत्रिक कामगार युनियनच्या विदर्भस्तरीय मेळाव्यात शनिवारी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी युनियनचे केंद्रीय अध्यक्ष विष्णुस्वरुप पाटील हे होते.
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता राजू बुरडे, मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधिक्षक अभियंता हरिष गजभे, कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार, सरचिटणीस आर.टी. देवकांत, युनियनचे उपाध्यक्ष नारायण सोनवणे, राज्य सचिव संतोष घारगे, केंद्रीय उपसचिव आर.जे.देवरे व रवी बारई आदी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
तांत्रिक कामगारांच्या मागण्या आपण समजून घेतल्या असून या विषयी राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याशी चर्चा करणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. निवृत्ती वेतन आणि कामाचा भार या दोन महत्वाच्या मागण्या असून त्या सोडविण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करणार असल्याचे ते म्हणाले. अटेन्शन रहा, पेन्शन मिळाल्याशिवाय राहणार नाही असे सांगून पालकमंत्री म्हणाले की, आजही राज्याच्या अनेक गावात वीज पोहचली नाही. तसेच विजेची गळती मोठया प्रमाणात होताना दिसत आहे. आपण सर्वांनी जबाबदारीने यात लक्ष घालावे.
वीज कंपन्यांच्या कार्यालयाची दुरावस्था झाली असून सामान्य माणसाला हे कार्यालय आपले वाटावे, असे निर्माण करा असा सल्ला त्यांनी दिला.
वीज कंपन्यांना यावर्षीच्या अर्थसंकल्पात २ हजार ७०० कोटी रुपयांचे अनुदान दिल्याचे त्यांनी यावेळी नमुद केले.
तांत्रिक कामगार युनियनच्या सदस्यांनी जबाबदारीने काम करावे, असे सांगून विष्णुस्वरुप पाटील म्हणाले की, निवृत्ती वेतन, वेतनात समानता, कामगार संरचना व वैद्यकीय सुविधा या तांत्रिक कामगारांच्या महत्वाच्या मागण्या आहेत. या मागण्या सरकारने पूर्ण कराव्यात असे ते म्हणाले. असे असले तरी सामान्य ग्राहकांना स्वस्त व अखंड वीज पुरवठा मिळण्यासाठी तांत्रिक कामगारांची जबाबदारी मोठी आहे. गावागावांना लागणारा विजेचा डाटा आपल्याकडे असायला हवा, या उद्देशाने काम करण्याचा सल्ला त्यांनी दिला.
चंद्रपूर महाऔष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता राजू बुरडे, मुख्य अभियंता दिलीप घुगल, अधीक्षक अभियंता हरीश गजभे, कार्यकारी अभियंता अर्चना घोडेस्वार, सरचिटणीस आर.टी. देवकांत, युनियनचे उपाध्यक्ष नारायण सोनवणे, राज्य सचिव संतोष घारगे, केंद्रीय उपसचिव आर.जे. देवरे व रवी बारई यांची यावेळी भाषणे झालीत. या कार्यक्रमाला विदर्भातील सर्व जिल्हयातील तांत्रिक कामगार युनियनचे पदाधिकारी व सदस्य मोठया संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: All help to solve the problems of technical workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.