वरोरा : शहरालगतच्या एकर्जुना गावाच्या परिसरात असलेल्या एका घरात दिवसा कुणीही नसल्याचे बघत चोरट्यांनी समोरच्या दाराचे कुलूप तोडून एक लाख नऊ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. ही घटना सोमवारी घडली.
सोमवारी अजाबराव भोयर आपल्या मुलीसोबत दुपारी १२ वाजताच्या सुमारास वरोरा शहरातील एका विवाह समारंभासाठी गेले तर त्यांची पत्नी एकर्जुना नर्सरीमध्ये कामाला गेल्या होत्या. घरातून बाहेर जाताना त्यांनी बाहेरच्या दरवाजाला कुलूप लावले होते. सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घरी आले असता समोरील दाराचे कुलूप तुटलेले दिसल्याने त्यांनी घरात जाऊन पाहणी केली. अलमारीमधील २५ हजार रुपये रोख, सोन्याची पोत (किंमत ७५ हजार) व तीन ग्रॅम सोन्याची रिंग असा एकूण एक लाख नऊ हजार किमतीच मुद्देमाल कपाटातून अज्ञात चोरांनी लंपास केल्याचे दिसून आले. याप्रकरणी वरोरा पोलिसात तक्रार देण्यात आली असून घटनास्थळावर चंद्रपूर येथील तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. या प्रकरणी वरोरा पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.