लोकमत न्यूज नेटवर्कचंद्रपूर : वर्धा नदीला पुन्हा पूर आल्याने आणि सात दिवसांपासून जोरदार पाऊस पडल्याने कोरपना तालुक्यात भोयेगाव-धानोरा मार्ग बंद झाला. या परिसरातील नाल्यांवर पाणी असल्याने गुरुवारी (दि. ११) सकाळी पाच गावांत बस पोहोचली नाही. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना संकटांचा सामना करावा लागला. त्यातच इरई धरणातील जलपातळी २०७.३२५ मीटरने वाढली. सकाळी ७:३० वाजता सात दरवाजे ०.२५ मीटरने उघडून प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. चिमूर शहरात गुरुदेव वार्डातील अनेक घरात पाणी शिरले. यात वसंत रामगुंडे यांच्या घराचे मोठे नुकसान झाले. घर मातीचे असल्याने कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
घराची भिंत कोसळली
सिंदेवाही : शहरातील प्रभाग क्र. १७ येथील शेतकरी अरविंद देवतळे यांच्या घराची भिंत कोसळली. त्यामुळे नुकसान झाले. बुधवारी सायंकाळी ६ ते ७वाजेच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस सुरू झाला. दसरा चौकातील देवतळे यांच्या घराची भिंत कोसळली.
विद्यार्थ्यांची अडचण
वर्धा नदीला पूर आल्याने भोयेगाव-धानोरा मार्ग बंद झाला. चंद्रपूर-कोरपना तालुक्याला जाण्याचा वळण मार्गही बंद आहे. त्यामुळे कोरपना, कवठाळा, इरई, मारडा व पेलोरा बससेवा प्रभावित झाली आहे. विद्यार्थ्यांना तालुकास्थळावरील शाळा व महाविद्यालयात जाण्यास अडचणींचा सामना करावा लागला.
किल्ल्याचा घुमट कोसळल्याने घरांचे नुकसान
बल्लारपूर : पावसाने येथील गोंडकालीन किल्ल्याचा बुरुज कोसळल्याने परिसरात नागरिकांच्या सुरक्षा भिंती व घरांचे नुकसान झाले. बसपाचे किशनकुमार केशकर यांनी याबाबत पुरातत्त्व विभाग व नगर परिषदला माहिती देऊन दुरुस्तीची मागणी केली. दरवर्षी पावसाने ऐतिहासिक किल्ल्याची भिंत व बुरुज कोसळतात. परंतु, दुरुस्ती होत नसल्याने बाजूच्या घरांना धोका उद्भवतो. अनेक ठिकाणी किल्ल्याच्या भिंतींना तडे गेले आहेत. यातून जीवित व वित्तहानी होण्याची शक्यता नागरिकांनी वर्तविली आहे.
कोसारातील एकतानगरात घरांभोवती पाणी
चंद्रपूरच्या कोसारा परिसरातील एकतानगरात एका बिल्डरच्या बांधकामामुळे पावसाचे पाणी साचून पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. बाहेर जाण्याचा मार्ग बंद झाला. नामदेव तडसे, आसेकर, वरारकर, खामनकर यांच्या घरांभोवती पाणी साचले. घरातून बाहेर निघणे कठीण झाले. नामदेव तडसे यांच्या हृदयाची शस्त्रक्रिया झाली आहे. अशा परिस्थितीत रुग्णालयात जायची वेळ आल्यास बाहेर निघायचे कसे, असा प्रश्न विचारला जात आहे. ग्रामपंचायतने याकडे लक्ष देऊन ये-जा करण्याचा मार्ग मोकळा करावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नदीकाठावर जाण्यास प्रशासनाकडून मनाई
दोन दिवसांपासून पाऊस सुरू असल्याने इरई धरणाचे सर्व दरवाजे उघडण्याची शक्यता आहे. पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव व माना येथील नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जटपुरा गेट परिसरात इमारतीचा जीर्ण भाग कोसळल्याने महिला जखमी
चंद्रपुरातील जटपुरा गेट परिसरात सकाळी ७ वाजेच्या सुमारास एका जुन्या इमारतीचा भाग कोसळल्याने महिला जखमी झाली. सुनीता लोखंडे असे जखमीचे नाव आहे. महिलेला जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. बाबूपेठ परिसरातही काही घरांची पडझड झाल्याची माहिती आहे.