घराला लावला फलक : ‘कृपयादारू पिऊन येऊ नये’ लोकमत न्यूज नेटवर्क भेजगाव : आपण आजपर्यंत अनेकांच्या घराला कुटुंबप्रमुखाचे नाव व पद असलेले फ लक बघितले आहे. याशिवाय कुठे ‘पादत्राणे बाहेर काढून ठेवा’, तर कुठे ‘कुत्र्यापासून सावधान’ असेही फ लक वाचण्यात आले आहेत. मात्र मूल तालुक्यातील भेजगाव येथील एका गृहस्थाने चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी असनाही चक्क आपल्या घराच्या दरवाजासमोर ‘कृपया दारू पिऊन येऊ नये’ असा फलक लावला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दोन वर्षापासून शासनाने दारूबंदी करून महिलांच्या मागणीचा सन्मान केला. जिल्ह्यात दारूबंदी झाल्याने दारूच्या आहारी गेलेल्या कुटुंबप्रमुखामुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होऊन उघड्यावर आले आहे. त्यांचे संसार पुन्हा सावरतील, या आशेने दारूबंदी करण्यात आली. महिलांमध्ये समाधान व्यक्त केले जात होते. मात्र दारूबंदीला दोन वर्षे पूर्ण झाली तरी चित्र मात्र बदललेले दिसत नाही. गावागावात दारूचा महापूर वाहताना दिसत आहे. या अवैध दारू विक्रीचा त्रास महिलांसह समाजातील सर्वच घटकांना होत आहे. समाजातील दारूड्यांना कंटाळून भेजगाव येथील एका गृहस्थाने तर चक्क घराच्या दरवाजासमोर ‘कृपया दारू पिऊन येऊ नये’ असा फ लकच लावला. भेजगाव येथे वर्षभरापासून अवैध दारु पुर्णत: बंद आहे. मात्र परिसरातील गावात दारु मुबलक आहे. त्यामुळे दारू पिणाऱ्याची संख्या कमी नाही. दारूबंदी असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात एका गृहस्थावर ‘दारू पिऊन येऊ नये’ असा फ लक लावल्याची वेळ यावी, ही दारूबंदीचे खरे फलित पुढे आणणारी बाब आहे. याचाही गांभीर्याने विचार व्हायला हवा. वाल्याचा झाला वाल्मिकी ४वाल्या कोळीचा वाल्मिकी कसा झाला, हे सर्वश्रुतच आहे. तसाच प्रकार येथेही झाला आहे. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होण्यापूर्वी सदर गृहस्थही मद्य प्राशन करायचा. त्याचा मुलगाही दारूच्या आहारी गेल्याने दिवसभर मेहनतीचे काम करूनही संसाराची बाताहत होत होती. भूमिहीन असलेल्या या गृहस्थाने जिल्ह्यात दारूबंदी लागू झाल्यानंतर दारुपासून फारकत घेतली. मनाचा निश्चय पक्का केला व घर दारूमुक्त केले. मात्र परिसरात मिळणारी अवैध दारू अन् दारुड्यांचा धिंगाणा, यामुळे हा गृहस्थ त्रस्त झाला आहे. दारू पिऊन येणाऱ्या व्यक्तीसोबत भांडण करण्यापेक्षा घरालाच त्यांनी ‘दारू पिऊन येऊ नये’ असा फ लक लावून टाकला.
मद्यपींना अशीही तंबी
By admin | Updated: May 22, 2017 01:18 IST