जिवती : निसर्गाच्या लहरीपणामुळे व पावसाच्या अनियमितपणामुळे खरिप पिकांची परिस्थिती अत्यंत बिकट होत आहे. अशा प्रतिकुल परिस्थितीवर मात करण्यासाठी राष्ट्रीय कृषी विमा योजना फायद्याची आहे. या योजनेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे, अशी विनंती तालुका कृषी अधिकारी राज वानखेडे यांनी केली आहे.या योजनेत जोखिमेवर ६० टक्के असून विमा संरक्षित रक्कम कापूस २१ हजार २०० रुपये, सोयाबीन १७ हजार २०० रुपये, तूर १८ हजार ७०० रुपये तर ज्वारी ११ हजार ८०० रुपये निश्चित करण्यात आली आहे. अल्पभूधारक (२ हेक्टरपर्यंत), अत्यल्प भूधारक (१ हेक्टरपर्यंत), शेतकऱ्यांना ९० टक्के तर इतर शेतकऱ्यांना (२ हेक्टरवरील), विमा हप्त्याची १०० टक्के रक्कम भरणे आवश्यक आहे. विमा हप्ता बँकेत भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. शेतकऱ्यांनी विहित नमुना अर्ज, सातबारा, ८ अ व पेरणीचे प्रमाणपत्र जोडून रक्कम जमा करावी. जी बँक शेतकऱ्यांचे अर्ज व रक्कम घेण्यास टाळाटाळ करतील. शेतकऱ्यांना सहकार्य करणार नाहीत अशा बँक व्यवस्थापकाची लेखी तक्रार शेतकऱ्यांनी करावी. महसूल यंत्रणा, जिल्हा परिषद आणि कृषि विभागावर संयुक्त जबाबदारी देण्यात आली असून जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत ही योजना पोहचविण्यासाठी संबधीत यंत्रणा प्रयत्नशील आहे.योजनेच्या व्यापक प्रचार व प्रसाराकरिता फ्लेक्स बॅनल, घडीपत्रिका, चावडी वाचन, ग्रामसभा ग्रामपंचायत संदेश बोर्डद्वारे माहिती देण्यात येत आहे. मंडळ कृषी अधिकारी प्रशांत मडावी हे समन्वय अधिकारी म्हणून कार्यरत असून त्यांच्या सोबत कृषी पर्यवेक्षक चव्हाण आणि बालाधरे वसर्व कृषी सहाय्यक शेतकऱ्यांना अर्ज भरून देण्यास मदत करीत आहेत. शेतकऱ्यांनी तहसील कार्यालय, पंचायत समिती व कृषी विभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधावा, अशी विनंती तालुका कृषी अधिकारी राज वानखेडे यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)
कृषी विमा योजना शेतकऱ्यांच्या फायद्याची
By admin | Updated: July 27, 2014 23:39 IST