चंद्रपूर : ग्रामीण भागाचा विकास करणारी महत्त्वाची संस्था म्हणून जिल्हा परिषदेला ओळखल्या जाते. मात्र याच मिनी मंत्रालयात कित्येक दिवसांपासून अधिकारी वर्ग एकचे सहा पदे रिक्त असल्यामुळे प्रशासकीय व्यवस्था कोलमडल्याचे दिसून येत आहे. पंचायत राज व्यवस्थेमुळे ग्रामीण विकास साधण्यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत ही त्रिस्तरीय व्यवस्था अस्तित्वात आली आहे. ग्रामीण भागाचा विकास याच कार्यालयाच्या माध्यमातून साधला जातो. मात्र जिल्हा परिषदेतील महत्त्वाचे असलेले अधिकारी पद रिक्त असल्याने विकासात अडचण निर्माण होत आहे. अनेक फाईली टेबलवरच धुळ खात पडल्या असल्याने मुख्य कामाची गती मंदावली आहे. आजघडीला चंद्रपूर जिल्हा परिषदेमध्ये अतिरिक्त मुख्य कार्यपालन अधिकारी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), कार्यकारी अभियंता, समाजकल्याण अधिकारी, मुख्यलेखा तथा वित्त अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) असे सहा प्रमुखांचे पदे रिक्त असून त्यांचा कार्यभार इतरांकडे सोपविला आहे. परिणामी अतिरिक्त कारभार सांभाळणारे अधिकारीही कामाच्या ताणामुळे वैतागले आहेत. (नगर प्रतिनिधी)
मिनी मंत्रालयातील रिक्त पदांमुळे प्रशासकीय व्यवस्था कोलमडली
By admin | Updated: September 9, 2014 23:21 IST