हजारोंची उपस्थिती : आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराचंद्रपूर : धनगर समाजाची आदिवासींमध्ये होणारी घुसखोरी शासनाने खपवूर घेऊ नये, या इतर मागण्यांच्या पूर्ततेसाठी जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेरील हजारो आदिवासी बांधव आज शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. मागण्या तात्काळ मंजूर न केल्यास रास्ता रोको, रेलरोको, जेलभरो यासारखे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही आदिवासी बांधवांनी दिला.आदिवासी आरक्षण बचाव समन्वय समितीच्या वतीने या मोर्चाचे आंदोलन केले होते. जिल्हाभरातील अनेक सामाजिक संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शविला होता. आज सकाळी ११ वाजेपासून आदिवासी बांधवांचे जत्थे चंद्रपुरात दाखल होऊ लाागले. जिल्ह्यातून व वर्धा व गडचिरोली जिल्ह्यातूनही अनेक आदिवासी बांधव मोर्चात सहभाग दर्शविण्यासाठी चंद्रपुरात एकवटले. जिल्हा कारागृहातील शहीद भूमी वीर बाबुराव शेडमाके स्मारक येथून दुपारी १२ वाजता मोर्चाला प्रारंभ झाला. कारागृहातून गांधी चौक मार्गे मोर्चा निघाला. प्रत्येक आदिवासी बांधवाने पिवळा दुपट्टा व पिवळी टोपी घातली होती. युवक, कर्मचारी, महिला व शेतमजूर असे सुमारे १५ ते २० हजार आदिवासी बांधव यात सहभागी झाले होते. यावेळी आदिवासी बांधवांनी आपले पारंपारिक वाद्य आणले होते. या वाद्यांच्या गजरातच चंद्रपुरातील प्रमुख मार्गाने मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा विसर्जित झाला. जिल्हाधिकारी डॉ.दीपक म्हैसेकर यांनी स्वत: निवेदन स्वीकारण्यासाठी यावे, अशी मागणी आदिवासी बांधवांनी केली. बराच वेळ प्रतीक्षा केल्यानंतरही जिल्हाधिकारी बाहेर आले नाहीत. अखेर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संतोष कुमरे, समाज कल्याण सभापती निलकंठ कोरांगे, उपसभापती मनोज आत्राम, अखिल भारतीय गोंडवाना महासभेचे मोहनसिंह मसराम, गोंडवाना गणतंत्र पार्टीचे प्रदेश सचिव विजयसिंह मडावी आदींच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी डॉ. दीपक म्हैसेकर यांची भेट घेत निवेदन सादर केले. मागण्या तत्काळ मान्य न केल्यास पुढे तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही दिला. (शहर प्रतिनिधी)
आदिवासी बांधव जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले
By admin | Updated: August 16, 2014 23:22 IST