नागभीड : तालुक्यात ४३ ग्रामपंचायतच्या सरपंच-उपसरपंचांची निवडणूक नुकतीच पार पडली. यासाठी महिलांसाठी काही ग्रामपंचायती आरक्षित करण्यात आल्या होत्या. मात्र या व्यतिरिक्त ५ ग्रामपंचायतींवर महिलांचीच निवड करण्यात आली आहे. तर ७ ग्रामपंचायतींवर उपसरपंच म्हणून निवड करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
प्रशासक नियुक्त करण्यात आलेल्या ४१ व अन्य २ ग्रामपंचायतींची निवडणूक व त्यानंतर सरपंच, उपसरपंच निवडीचा कार्यक्रम नुकताच पार झाला. या निवडणुकीत २०३ महिलांची सदस्य म्हणून निवड करण्यात आली आहे. नागभीड तालुक्यात अगोदर ६५ ग्रामपंचायती होत्या. यातील ९ ग्रामपंचायतींचा समावेश नागभीड नगर परिषदेत करण्यात आल्याने आता तालुक्यात एकूण ५६ ग्रामपंचायती आहेत. यातील १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका यापूर्वीच पार पडल्या आहेत.
महिला आरक्षणातून ज्या महिलांची सरपंच म्हणून निवड झाली त्यात कानपा येथे कुंदना काटले, ढोरपा येथे सविता निशाने, मौशीत रागिनी करकाडे, पाहार्णीत मंजुषा गायकवाड, पांजरेपार येथे योगिता उरकुडे, कोर्धात पुष्पा चौधरी, ओवाळा येथे निशा रामटेके, कोथुळना येथे मंजुषा डहारे, बोंडमध्ये निशा सिडाम, नवेगाव हुंडेश्वरीत कल्लूताई नेवारे, विलम येथे निरंजना बावणे, चिकमारा येथे तृप्ती रामटेके, जनकापूरमध्ये वैशाली गायधने, तळोधीत छाया मदनकर तर कोजबी माल येथे शेवंता भोयर यांचा समावेश आहे. उल्लेखनीय बाब ही की, ७ ग्रामपंचायतीत महिलांची उपसरपंच म्हणून निवड करण्यात आली आहे. यात देवपायली येथे इंदिरा भोजराज नवघडे, बाळापूर बुज येथे पुष्पमाला जनबंधू, मिंडाळा येथे अर्चना पुंडलिक मडावी, म्हसली येथे वसुधा नामदेव गुरुपुडे, बालापूर खुर्द येथे सरोज धनू मेश्राम, मेंढा येथे गायकवाड तर वैजापूर शीला बोरकर या महिलांचा समावेश आहे.
बॉक्स
आरक्षणाव्यतिरिक्त सरपंच बनलेल्या महिला
तालुक्यात काही ग्रामपंचायतीमध्ये महिला व्यतिरिक्त पुरुषही सरपंच होऊ शकले असते अशा ५ जागांवर महिलांची सरपंच म्हणून निवड करण्यात आली आहे. यामध्ये देवपायली येथे नामाप्र प्रवर्गातून अर्चना शरद ठाकरे, मोहाळी येथे अनु. जमाती प्रवर्गातून अस्मिता आनंदराव पेंदाम, बिकली येथे अनु. जमाती प्रवर्गातून शालू चौधरी, पान्होळी येथे सर्वसामान्य प्रवर्गातून सविता तुळशीदास बोरकुटे तर आलेवाही येथे सर्वसामान्य प्रवर्गातून योगिता देवानंद सुरपाम या महिलांनी सरपंचपद हस्तगत केले आहे.