मोहीम तिव्र: झोन क्रमांक ३ मध्ये झाली कारवाई चंद्रपूर : थकबाकीदार मालमत्ताधारकांवर मनपाने आता कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. मनपाच्या कर वसुली पथकाने आज शनिवारी येथील झोन क्रमांक ३ मधील काही थकबाकीदार मालमत्ताधारकांची मालमत्ता जप्त केली. त्यामुळे थकबाकीदारांचे धाबे दणाणले आहे.आज सकाळच्या सुमारास झोन क्रमांक ३ मध्ये मनपा आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली कर वसुली पथक मालमत्ता जप्त करण्यासाठी पोहोचले असता काही मालमत्ताधारकांनी मनपाचा थकीत कर अदा केला. जे मालमत्ताधारक कराचा भरणा करू शकले नाही. त्यांची मालमत्ता जप्त करण्यात आली. अनेक मालमत्ताधारकांनी मनपाचा कर मागील अनेक वर्षांपासून थकीत ठेवला आहे. परिणामी मनपाच्या तिजोरीत निधीचा मोठा अभाव निर्माण होत आहे. मात्र आता अशा कर थकबाकीदारांवर मनपाने जप्तीची धडक कारवाई करायला सुरुवात केली आहे. आज मनपा आयुक्त संजय काकडे यांच्या मार्गदर्शनाखाली जप्तीची कारवाई करण्यात आली.झोन क्रमांक ३ मध्ये झालेल्या या कारवाईत शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. सकाळी १० वाजताच्या सुमारास हे पथक जैन काँप्लेक्समध्ये पोहोचले. मात्र यावेळी मुकेश जैन यांनी मनपा पथकाला थकीत असलेला ९३ हजार ६०० रुपयांचा कर अदा केला. त्यामुळे त्यांच्यावरील मालमत्ता जप्तीची कारवाई टळली. मात्र राजलक्ष्मी यांच्या घरातील किरायदार यांनी कराचा भरणा करण्यास नकार दिल्याने त्यांच्यावर मालमत्ता जप्तीची कारवाई करण्यात आली. यासोबतच डॉ. इंगोले यांच्यावरही जप्तीची कारवाई करण्यात आली. (शहर प्रतिनिधी)
थकबाकीदार मालमत्ताधारकांवर मनपाची जप्तीची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2017 00:40 IST