दारुपार्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईस दिरंगाई
By Admin | Updated: April 16, 2016 00:45 IST2016-04-16T00:45:21+5:302016-04-16T00:45:21+5:30
तालुक्यातील चंदनखेडा येथील विदर्भ कोकण बँकेच्या शाखेत बँक शाखा अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी नेहमीच दारूपार्टी करीत असल्याची तक्रार ...

दारुपार्टी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईस दिरंगाई
बँकेतील प्रकार : तक्रारीला वरिष्ठांकडून केराची टोपली
भद्रावती : तालुक्यातील चंदनखेडा येथील विदर्भ कोकण बँकेच्या शाखेत बँक शाखा अधिकाऱ्यासह दोन कर्मचारी नेहमीच दारूपार्टी करीत असल्याची तक्रार गावकऱ्यांनी आठ महिन्यापूर्वी बँकेच्या अध्यक्षांकडे केली होती. मात्र त्या अधिकारी, कर्मचाऱ्यांवर अद्यापही कोणतीच कारवाई करण्यात न आल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
चंदनखेडा हे गाव केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आदर्श गाव करण्याचे हेतूने दत्तक घेतले आहे. अशा गावात या प्रकारचे अधिकारी व कर्मचारी राहिल्यास खरच ते गाव आदर्श होईल का? असा प्रश्न गावकरी करीत आहेत. चंदनखेडा बँकेचे शाखा व्यवस्थापक म्हणून सुधाकर बरडे हे रूजू झाल्यापासून ते आपल्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना सोबत घेवून बँक बंद झाल्यानंतर बंद दार बँकेत नेहमीच दारू पार्टी करतात. यात ते आपले कर्मचारी रोखपाल भैय्या वाघ, चपराशी रितेश दोहतरे यासह इतर जवळच्या मित्रांना सोबत घेतात.
या शाखा अधिकाऱ्याचा त्यांचे कर्मचारी व मित्रांसोबत दारू पित असलेली मोबाईलद्वारे व्हिडीओ शुटींग प्रथम चंद्रपूरचे विभागीय व्यवस्थापक यांचेकडे तक्रारीसह घेवून गेले असता, त्यांनी ते घेण्यास नकार दिला. विभागीेय व्यवस्थापकांनी त्यांच्या या कृत्याला नकार देवून एक प्रकारचे त्यांच्या कृत्याचे समर्थन केले. नंतर ही तक्रार विदर्भ कोकण ग्रामीण बँकेचे नागपूर येथील अध्यक्ष यांच्याकडे पाठविण्यात आली. परंतु आठ महिन्यात कालावधी लोटून सुद्धा तक्रारीची दखल घेण्यात आली नाही.
विशेष म्हणजे चंद्रपूर जिल्हा हा दारूबंदी जिल्हा असल्याने एखाद्या शासकीय कार्यालयात असा प्रकार चालत असताना त्याची दखल घेणे गरजेचे होते.
परंतु या कृत्याला बँकेचे वरिष्ठ अधिकारीच समर्थन देत असेल तर त्या बँकेचा व्यवहार कसा असेल, हे दिसून येते. (शहर प्रतिनिधी)