लोकमत न्यूज नेटवर्क पोंभूर्णा : इयत्ता दहावी-बारावीची परीक्षा कॉपीमुक्त व्हावी, यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने नवा पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्येक परीक्षा केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्र संचालक आता दुसऱ्या शाळा-महाविद्यालयातील असतील.
येत्या ११ फेब्रुवारीपासून इयत्ता बारावीची लेखी परीक्षा सुरू होईल व १८ मार्च रोजी संपेल. तर इयत्ता दहावीची परीक्षा २१ फेब्रुवारी ते १७ मार्चपर्यंत चालणार आहे. शहरातील परीक्षा केंद्रावर ५ ते ७ किलोमीटर अंतरावरील ग्रामीणमधील शाळा, कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांना पर्यवेक्षक म्हणून नेमले जाणार आहे. शिक्षकांना केंद्रावर जाण्यासाठी वेळ लागणार नाही, याची दक्षता घेतली जाणार आहे. गैरप्रकाराला आळा घालण्यासाठी हा पॅटर्न राबवला जाणार आहे.
आता कॉपीमुक्त परीक्षेसाठी प्रत्येक केंद्रावरील पर्यवेक्षक व केंद्र संचालकच बदलण्याचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे. हा निर्णय म्हणजे शिक्षकांवर अविश्वास दाखविण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे शिक्षकांची प्रतिमा मलीन होईल, असा आरोप केला जात आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेने या निर्णयाला तीव्र विरोध केला आहे. या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
सीसीटीव्हीही बसविले नाही मागील वर्षी कॉपीमुक्त परीक्षेसाठी सरमिसळ पद्धतीचा अवलंब केला. एका परीक्षा केंद्रावर पाच किमी अंतरावरील विविध शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी बसविले. मात्र, परीक्षा केंद्रावरील बहुतांश पर्यवेक्षक त्याच शाळेतील असल्याने कॉपी प्रकाराला आळा बसविण्यात काही अंशी अपयश आले. शिक्षण विभागाने शाळांमध्ये सीसीटीव्ही बसविण्याचे बंधन घातले. पण, अजूनही बहुतांश शाळांमध्ये सीसीटीव्ही नाहीत किंवा ते नावालाच असल्याची वस्तुस्थिती आहे.
"फक्त केंद्र संचालक आणि उपकेंद्र संचालक यांची अदलाबदल करण्यात यावी. पर्यवेक्षक तसेच अन्य कर्मचाऱ्यांना मूळ शाळेतच ठेवावे."- दिलीप मॅकलवार, जिल्हा कार्यवाह, मराशिप जिल्हा चंद्रपूर.