दुर्गापूर : आठ दिवसात दाम दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवित फसवेगिरी करणाऱ्या एका महिलेने दुर्गापूर परिसरातील महिलांना तब्बल ६३ लाखांनी गंडविल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
याबाबत पीडित महिलांनी दुर्गापूर ठाण्यात तक्रार दिली असता पोलिसांनी दोन महिलांना अटक केली आहे.
सुजाता बाकडे (३३) रा. आश्रय अपार्टमेंट आयप्पा मंदिर जवळ तुकूम असे त्या फसवणूक करणाऱ्या महिलेचे नाव आहे. तिने दुर्गापूर ठाणे परिसरातील सामान्य महिलांना गाठून सुरुवातीला एका महिन्यात दाम दुप्पट करून पैसे परत देण्याचे आमिष दाखविले. याला बळी पडत काही महिलांनी पैसे गुंतविले. त्यांना महिनाभरात दुपटीने पैसे परत केले. असे फसवेगिरीचे जाळे पसरविण्याकरिता परत तीन महिन्यात दुप्पट पैसे देण्याचे षडयंत्र रचून महिलांकडून लाखो रुपये घेतले. काही महिलांना त्यातले काही पैसे परत केले. त्यानंतर त्या महिलेने १ जानेवारीची विशेष ऑफर आहे, आठ दिवसात पैसे दुप्पट परत देण्याची बतावणी केली. या भूलथापांना बळी पडत अनेक महिलांनी अंगावरचे सोने गहाण ठेवून, बचत गटातून व्याजाने पैसे घेऊन तसेच उसनवारीने पैसे घेऊन लाखो रुपये तिच्याकडे जमा केले.
तीन महिने लोटून गेल्यानंतरही तिने एकाही महिलेचे दुपटीने पैसे परत केले नाही. आणि ती एकूण ६२ लाख ८० हजार रुपये घेऊन पसार झाली. याबाबत गुरुवारी तब्बल ३२ महिलांनी दुर्गापूर ठाण्यात तक्रार नोंदवली आहे. त्यावरून दुर्गापूर पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन कलम ४२० (३४) अन्वये फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. मुख्य आरोपी सुजाता वाकडेसह कांचन रामटेके (३५ ) रा. छत्रपती नगर तुकुम या दोन महिलांना अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास ठाणेदार स्वप्निल धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक रोशन बावनकर करीत आहेत.
महिलांना फसविणाऱ्या या दोघीच आहे की त्यामागे टोळी सक्रिय आहे, याचा तपासही पोलीस करीत आहेत.