६८ प्रकरणामध्ये राज्य उत्पादन विभागाची कारवाई
चंद्रपूर : दारू बंदी असतानाही चोरट्या मार्गाने दारू आणल्या प्रकरणी राज्य उत्पादन शुल्क विभागाने डिसेंबर महिन्यामध्ये ६८ प्रकरणामध्ये तब्बल ५० जणांवर कारवाई केली. याप्रकरणी ३३ लाख ७६ हजार रूपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आल्याची माहिती राज्य उत्पादन शुल्क, राजुराचे निरीक्षक मारूती पाटील यांनी दिली. दरम्यान, हरदोना-राजुरा मार्गावर मंगळवारी ६ लाखांची दारू जप्त केली. या प्रकरणातील आरोपी फरार होण्यात यशस्वी झाले.
राज्य उत्पादन शुल्क राजुरा कार्यालयाच्या भरारी पथकाने माहितीच्या आधारे हरदोना-राजुरा
मार्गावर पाळत ठेवून बोलेरो महिन्द्रा चारचाकी वाहन क्रमांक एमएच ३४ बीजी २५९२ या वाहनातून रॉकेट देशी दारू संत्रा या ब्रन्डच्या १८० मिलीच्या एकुण २५ बॉक्स व वाहन जप्त केले. वाहनासह मुद्देमालाची एकुण अंदाजे किंमत रूपये सहा लाख वीस हजार आहे.
गुन्ह्यातील आरोपी रात्री अंधाराचा फायदा घेवून फरार झाले असुन संबंधित आरोपींना फरार घोषित करून त्यांच्या विरूध्द महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास राज्य उत्पादन शुल्क अधिक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मारुती पाटील व त्यांची चमू करीत आहे .