राजुरा : राजुरा तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीतील ८४ वॉर्डातील २०९ जागेसाठी निवडणूक घोषित करण्यात आली. त्यातील २६ जागेवर २६ उमेदवार बिनविरोध निवडून आले आहे. उर्वरित १८४ जागांसाठी ४३५ उमेदवार रिंगणात आहे. उमेदवारांनी गावातील वातावरण गरम केले आहे. प्रत्येक उमेदवार घरोघरी जाऊन निवडून देण्याचे साकडे घालत आहे. ग्रामपंचायतमधील प्रत्येक वार्डात बहुरंगी लढत होणार आहे.तालुक्यातील २७ ग्रामपंचायतीमध्ये येत्या ४ आॅगस्टला निवडणूक होणार आहे. यात सर्वात मोठी चुनाळा ग्रामपंचायत असून त्यात पाच प्रभागातून १३ उमेदवार निवडून द्यावयाचे आहे. तसेच गोवरी ग्रामपंचायतीमधील चार प्रभागातून ११ उमेदवार, चंदनवाह, चिंचोली (बु.) बामनवाडा, विहीरगाव, कढोली (बु.) येथील तीन प्रभागातून प्रत्येकी ९ उमेदवार तथा उर्वरीत वरोडा, पवनी, मुठरा, पंचाळा, सातरी, चार्ली, कळमना, खामोना, कोहपरा, चनाखा, पेल्लोरा, मूर्ती, धानोरा, नलफडी, सुमठाणा, सिंधी, कोलगाव, मारडा, चिंचोली (खु.) कविठपेठ येथील तीन प्रभागातून प्रत्येकी सात उमेदवार निवडून द्यावयाचे आहे. या निवडणुकीत काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस, संघटना व शिवसेना यांनी उमेदवार उभे करुन निवडणूक अटीतटीची केली आहे. चुनाळा ग्रामपंचायतीमध्ये १३ उमेदवार निवडून द्यावयाचे असून यात काँग्रेस, राकाँ व भाजपा यात अटीतटीची लढत होणार आहे. हे गाव माजी आमदार सुदर्शन निमकर यांचे जन्मगाव आहे. यापूर्वी येथे काँग्रेस पक्षाचे सरपंच होते. त्यामुळे काँग्रेस, राकाँ व भाजपाच्या कार्यकर्त्यांनी विशेष लक्ष देवून निवडणूकीत वातावरण गरम केले आहे. तीच स्थिती गोवरी येथे असून तेथे राकाँ व शिवसेना युती असून त्याची लढत काँग्रेस व भाजपा उमेदवारात होणार आहे. तसेच उर्वरीत ग्रामपंचायतीमध्ये स्थानिक स्तरावर व गाव पातळीवर आपसी समजोता विविध पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. समजोता न झालेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभे करुन अटीतटीची लढत कायम केली आहे.भाजपाचे आमदार अॅड. संजय धोटे, काँग्रेस माजी आमदार सुभाष धोटे, शेतकरी संघटनेचे माजी आमदार अॅड. वामनराव चटप, राकाँचे माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी गावोगावी जाऊन मतदाराची भेट घेऊन उमेदवारांना निवडून देण्याची मागणी करीत आहे. प्रत्येक पक्षाचे कार्यकर्तेसुद्धा सक्रिय झाले असून आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी सतत प्रयत्न करीत आहे. या निवडणुकीत लोकसभा व विधानसभा निवडणुकीची हवा कायम राहिली तर ठिक अन्यथा चित्र पालटू शकते. (शहर प्रतिनिधी)
राजुरा तालुक्यात २०९ जागांसाठी ४६१ उमेदवार रिंगणात
By admin | Updated: July 31, 2015 01:25 IST