लोकमत न्यूज नेटवर्क चंद्रपूर : मकर संक्रांतीनिमित्त नायलॉन मांजाचा वापर मोठ्या प्रमाणात होण्याची शक्यता असल्याने चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यातील नायलॉन मांजा विकणाऱ्या ३४ जणांना १३ ते १५ डिसेंबर या कालावधीत तडीपार केले आहे. यात शहर पोलिस स्टेशन चंद्रपूर येथील १९, रामनगर येथील आठ, घुग्घुस येथील दोन, दुर्गापूर चार, तर मूल येथील एकाला तडीपार केले आहे. राज्यातील यावर्षीची ही पहिलीच कारवाई असल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले आहे.
प्लास्टिक व इतर कृत्रिम वस्तूंपासून बनविलेल्या नायलॉन मांजाच्या नावाने परिचित असलेल्या पक्क्या धाग्याचा वापर पतंग उडविण्यासाठी करतात. त्यामुळे पक्ष्यांना व मानवी जीवितास तीव्र इजा होते. यावर शासनाने बंदी घातली आहे. पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलिस अधीक्षक रिना जनबंधू यांनी नायलॉन मांजावर प्रतिबंध घालण्यासाठी विशेष पथक तयार करून धाडी घालण्यास सुरुवात केली. एवढेच नाही, तर तब्बल ३४ नायलॉन मांजा विक्रेत्यांना तडीपार केले. ही कारवाई एलसीबीचे ठाणेदार महेश कोंडावार, शहर पोलिस स्टेशनच्या ठाणेदार प्रभावती एकुरके, रामनगरचे ठाणेदार आसिफराजा शेख, घुग्घुसचे ठाणेदार श्याम सोनटक्के, दुर्गापूरच्या ठाणेदार लता वाडीवे, मूलचे ठाणेदार सुमित परतेकी यांनी केली.