चंद्रपूर : कोराना प्रतिबंधासाठी शनिवारपासून जिल्ह्यात लसीकरण सुरू झाले. संशोधकांचे अहाेरात्र परिश्रम व आधुनिक आरोग्य विज्ञानाच्या बळावर कोरोना महामारीचा नायनाट करण्यासाठी अवघ्या सहा महिन्यांत लस उपलब्ध झाली. त्यामुळे आनंद आणि खबरीदारी या दोन्ही बाबी अनेकांच्या मनात घर करून आहेत. परिणामी, पहिल्या दिवशी ६०० जणांना डोस देण्याचे नियोजन असताना २६९ जण गैरहजर होते, अशी माहिती पुढे आली. दरम्यान, नोंदणी केलेल्या कोरोना योद्ध्यांना टप्प्याटप्याने डोस देण्याचे उद्दिष्ट पूर्ण होईल. पहिल्या दिवशी एकही डोस वाया गेला नाही, असा दावा जिल्हा आरोग्य प्रशासनाने केला आहे.
कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी पहिल्या दिवशी सहा केंद्रांचे नियोजन झाले होते. प्रत्येक केंद्रांवर १०० याप्रमाणे ६०० जणांना डोस देण्यात येणार होते. मात्र, वैद्यकीय महाविद्यालय ३५, वरोरा उपजिल्हा रुग्णालय ६१, चंद्रपूर मनपाच्या दोन केंद्रांत ११४, ब्रह्मपुरी ग्रामीण रुग्णालयात ४०, असे एकूण ३३१ जणांचे लसीकरण झाले. ६०० जणांचे उद्दिष्ट असलेल्या पहिल्या दिवशी २६९ जण लसीकरणासाठी गैरहजर होते. लसीबाबतचे गैरसमज दूर होत असल्याने पहिल्या टप्प्यासाठी नोंदणी केलेल्या १६ हजार ५२४ जणांचे लसीकरण पूर्ण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
लस पूर्णत: सुरक्षित
लस घेतल्यानंतर सुरुवातीला थोडा ताप व काही किरकोळ लक्षणे आढळतात. त्यानंतर मात्र आराेग्य पूर्वपदावर येते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, अफवांवर विश्वास ठेवू नये. आरोग्य विभागाकडून शास्त्रीय माहिती घेण्याचा सल्ला डॉक्टर देत आहेत.
१६ जानेवारीपासून सुरू झालेली मोहीम उद्दिष्टानुसार पूर्ण होत आहे. लस घेतलेल्या जिल्ह्यातील एकाही व्यक्तीवर आजमितीस अनिष्ट परिणाम झाला नाही. ही लस पूर्णत: सुरक्षित असल्याचे आरोग्य प्रशासनाकडून समजावून सांगण्याचे काम सुरू आहे.