वरोरा : उघड्यावर शौचास बसू नये, याकरीता शासनाच्या वतीने मोठ्या प्रमाणात योजना राबवून शौचालय बांधण्यास नागरिकांना उपकृत केले जात आहे. मात्र, असे असताना वरोरा तालुक्यातील १२ अंगणवाड्यांना शौचालय बांधण्याकरीता जागाच उपलब्ध नसल्याने प्रशासनासमोर मोठा पेच निर्माण झाला आहे. वरोरा तालुक्यात मोठ्या अंगणवाड्या २०४ असून चार अंगणवाड्या लहान अशा २०८ अंगणवाड्या आहेत. या अंगणवाड्यांत तालुक्यातील ६,९५५ बालके आहेत. या बालकांसाठी अंगणवाडी लगतच शौचालय असणे शासनाने अनिवार्य केले आहे. यामध्ये वरोरा तालुक्यातील ३२ अंगणवाड्यांना शौचालये नाही तर २१ अंगणवाड्यातील शौचालयाचे बांधकाम सुरू आहे. १२ अंगणवाड्याची इमारती बांधून अंगणवाड्या सुरू झाल्या. मात्र आता या अंगवाड्यालगत शौचालये बांधण्याकरीता जागाच उपलब्ध नाही. तर बहुतांश गावामध्ये शासकीय जागा उपलब्ध नसल्याने प्रशासन ‘अंगणवाडी लगत शौचालय’ योजनेमध्ये मोठ्या कात्रीत सापडला आहे. गावातील प्रत्येक घरात, शाळा व अंगणवाड्यामध्ये शौचालय बांधणे व त्याचा वापर करणे अलिकडच्या काळात शासनाने अनिवार्य केले आहे. या कामामध्ये कामचुकारपणा करणाऱ्या शासकीय कर्मचाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई करणे सुरू केले आहे. प्रत्येक नागरिक व बालकाने शौचालयाचा वापर केल्यास गाव हागणदारी मुक्त होईल, रोगराईला आमंत्रण मिळणार नाही. त्यामुळे शौचालयाच्या वापरावर प्रशासनाने अधिक भर दिला आहे. शौचालयचा वापर बालपणापासूनच करण्याची सवय बालकांना लागावी, त्यासाठी शाळा व अंगणवाड्यामध्ये शौचालय बांधणे शासनाने अनिवार्य केले. परंतु, १२ अंगणवाड्यांना शौचालय बांधण्याकरीता जागाच उपलब्ध नसल्याने पेच निर्माण झाला आहे. याबाबत एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होऊ शकला नाही. (तालुका प्रतिनिधी)
१२ अंगणवाड्यांत शौचालय बांधण्याचा पेच
By admin | Updated: February 27, 2015 00:50 IST