राजुरा : जिल्ह्यात अपुऱ्या पावसाळ्यामुळे खरीप हंगाम धोक्यात आलेला होता. अपुरा पाऊस दुबार पेरणीचे संकट, यामुळे शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. अशा दुष्काळग्रस्त परिस्थितीत शेतकऱ्यांना मदतीचा हात मिळावा, यासाठी आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हा दुष्काळग्रस्त करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली होती. तसेच दुष्काळावर कायमस्वरूपी मात करण्यासाठी जिल्ह्यातील बारमाही वाहणाऱ्या नद्यांवर बॅरेजेस बंधारे बांधण्याची मागणीसुद्धा आमदार सुभाष धोटे यांनी केली होती. उद्भवलेल्या दुष्काळी स्थितीचा विचार करून चंद्रपूर जिल्ह्यातील ११ तालुके शासनाने दुष्काळग्रस्त म्हणून घोषित केले आहे. यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून सवलतीचा लाभ मिळणार आहे.राज्यात एकुण ३५५ पैकी १२३ तालुके दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले. त्यात चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा, कोरपना, जिवती, गोंडपिपरी, पोंभुर्णा, मूल, चंद्रपूर, बल्लारपूर, वरोरा, भद्रावती व नागभीड या ११ तालुक्यांचा समावेश आहे. चंद्रपूर जिल्ह्यात खरीप हंगामात कापूस, सोयाबीन, भात या पिकांची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. मात्र यावर्षी जून, जुलै, आॅगस्ट महिना लोटल्यानंतरही समाधानकारक पाऊस नसल्याने अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील खरीप हंगाम धोक्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांना काही ठिकाणी दुबार, तिबार पेरणी करावी लागली आहे. काही ठिकाणी भात पिकासाठी टाकलेली रोपे करपून गेलीत. यामुळे शेतकऱ्यांवर नविन आर्थिक संकट ओढवलेले आहे. आधिच कर्जाच्या खाईत लोटल्या गेलेल्या शेतकऱ्यांसमोर निसर्गाच्या प्रकोपामुळे मोठे संकट ओढवले आहे. जिल्ह्यातील अनेक तलाव, नद्या, नाले अजुनही कोरडेच आहेत. आता खरीप हंगामाची वेळ निघुन गेली आहे. यामुळे शेतकऱ्यांसमोर जगण्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले होते. याही वर्षी आतापर्यंत समाधानकारक पावसाची नोंद झालेली नाही. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न व जनावरांसाठी चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. शिवाय शेतकरी कर्जाच्या ओझ्याखाली दबणार आहेत. कमी पर्जन्यमानामुळे भुजल पातळी खालवण्याची शक्यता आहे. अशा स्थितीमध्ये शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीची अपेक्षा आहे.दुष्काळावर मात करण्यासाठी या भागातून बारमाही वाहण्याऱ्या नद्यांवर पश्चिम महाराष्ट्राच्या धरतीवर बॅरेजेस बंधारे निर्माण करण्याची मागणीसुद्धा आमदार सुभाष धोटे मागील पाच वर्षांपासून सातत्याने करीत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त घोषित झालेल्या ११ तालुक्यातील शेतकऱ्यांना शासनाकडून मदतीचा हात व विशेष सवलत मिळणार आहे. याबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. (तालुका प्रतिनिधी)
जिल्ह्यातील ११ तालुके दुष्काळग्रस्त घोषित
By admin | Updated: August 14, 2014 23:39 IST