अनेकदा असं होतं की, ऑफिसात सहकारी आपलं ऐकत नाहीत. अनेकांना तर कार्यालयांत गमत्या समजतात. अशी व्यक्ती लीडर असेल, तर मग विचारायलाच नको. सहकाऱ्यांनी तुम्हाला सिरिअसली घेण्यासाठी नुसती पुस्तकी हुशारी उपयोगाची नाही, तर आपण काय बोलतो, आपले म्हणणे कसे मांडतो, यावर बरेच काही अवलंबून असते. चला बघू या सहा टिप्स...
प्राण जाए पर वचन न जाए... : तुम्ही तुमचा दिलेला शब्द पाळता की नाही, यावर तुमची प्रतिमा निर्माण होते. शब्द पाळला नाही, तर ती डागाळलीही जाते. ‘मी हे करीन’ असं बोलला असाल, तर तसे करा. जे लोक शब्दाला पक्के असतात, ते इतरांना अधिक विश्वासार्ह वाटतात.
दबाव येतोय? शांत राहा : सामान्य परिस्थितीत कुणीही उत्तम काम करेल. पण, खरी कसोटी दबावात लागते. कठीण स्थितीत दीर्घ श्वास घ्या. हळू बोला. तुमचा मुद्दा स्पष्टपणे मांडा. दबावाखाली शांत राहणं हे प्रभावी नेतृत्व, समजूतदारपणा आणि संयम याचं प्रतीक असतं.
होयबा बनू नका, मूल्यही जपा : नुसतंच ‘हो’ ला ‘हो’ लावू नका. एका मर्यादेपलीकडे तडजोड नको. तुम्ही जबाबदारी घ्या, टीमलाही जबाबदारी द्या. तुमच्या बोलण्या-वागण्यात, प्रयत्नांत सातत्य असेल, तेव्हा लोक तुम्हाला गंभीरपणे घेतात. कठीण प्रसंगीही तुमचं मत ठामपणे मांडा.
पूर्वतयारीवर अधिक भर द्या : पूर्वतयारीतून आदराची भावना निर्माण होते. तुम्ही सहकाऱ्यांचा वेळ व मतांना किंमत देता, हे तुमच्या तयारीतून दिसून येते. काय करायचे ते ठरवा. प्रश्न काढा. समस्या सांगू नका, उपाय सूचवा. ज्यांची तयारी पक्की, त्यांना लोक किंमत देतात.
फापटपसारा नको, नेमकं बोला : फालतू शब्द टाळा. वाचाळपणा टाळा. महत्त्वाचं तेवढंच बोला. सहकाऱ्यांनी तुमचं ऐकावं असं वाटत असेल तर त्यांच्या वेळेची कदर करा. स्पष्ट आणि स्वच्छ बोला. कमीत कमी शब्दांत मुद्दा मांडा. असा संवाद तुमचा प्रभाव वाढवतो.
तुमची नेमकी भूमिका समजून घ्या : तुमची नेमकी भूमिका काय, याबद्दल तुमच्या मनात संभ्रम नको. तुमच्याकडे कोणती नवी कल्पना आहे, याला महत्त्व आहे. गोंधळून न जाणाऱ्या, आपल्या भूमिकेनुसार काम करणाऱ्यांचा लोक किंमत देतात