चिखली (जि. बुलडाणा): खडकपूर्णा प्रकल्पांतर्गत झालेल्या उपसा सिंचन योजनेच्या टप्पा क्रमांक ४ व टप्पा क्रमांक ३ अंतर्गत मुरादपूर फाटा ते खैरव शिवरापर्यंंत कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याने खडकपूर्णेचे पाणी तालुक्यातील भरोसा, वसंतनगर, मुरादपूर व शेजारील डो्रढा येथील शेतकर्यांच्या मुळावर उठले आहे. कालव्याशेजारील शेतात पाणी पाझरले असून, सुमारे ६00 हेक्टर शेती चिबडल्याने सर्वत्र रब्बी हंगामातील पिके बहरली असताना उपरोक्त गावातील लाभार्थी शेतकर्यांची अद्याप पेरणीदेखील झाली नसून, प्रचंड नुकसान सोसावे लागत आहे. जिल्हय़ातील महत्त्वाकांक्षी खडकपूर्णा प्रकल्पामुळे सुमारे १३ हजार हेक्टराहून अधिक कोरडवाहू शेतजमीन ओलिताखाली आली आहे. यात वाढ होऊन चिखली तालुक्यातील शेतकर्यांनाही सिंचनाची सुविधा उपलब्ध व्हावी या उदात्त हेतूने माजी मंत्री भारत बोंद्रे यांच्या प्रयत्नातून तालुक्यातील भरोसा येथे पंप हाऊसची निर्मिती करण्यात येऊन मुख्य कालवा व उपसा सिंचन टप्पा क्रमांक ३ चे काँक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. दरम्यान, या कालव्यात पाणी सोडल्यामुळे सतत दुष्काळाचा सामना करणार्या या भागातील शेतकर्यांची जमीन ओलिताखाली आल्याचे पाहून शेतकर्यांमध्ये कमालीचे चैतन्य पसरले होते; मात्र कालव्याचे कंत्राट घेणार्या कंत्राटदाराने अंचरवाडी ते भरोसा येथील पंप हाऊसपर्यंत केलेल्या कालव्यात कमी सिमेंट व वाळूऐवजी गिट्टीची चुरी वापरून निकृष्ट दर्जाचे काम केल्यामुळे कालव्यातून सोडण्यात येणारे पाणी पाझरून कालव्याशेजारील शेतात शिरले आहे. या पाण्यामुळे भरोसा येथील सरस्वती राऊत, कृष्णा शेटे, शिवाजी थुट्टे, दत्तात्रय मुळे, एकनाथ शेरे, डिगांबर राठोड, संतोष शेरे, रामदास राऊत, राजेंद्र राऊत, अशोक जाधव, नामदेव थुट्टे, नामदेव राऊत, सुनंदा जाधव, भास्कर जाधव, शे. कदीर शे. बाबन, विठ्ठल थुट्टे, ज्ञानेश्वर थुट्टे, किसन गवई, देवीदास जाधव तर वसंतनगर येथील उक्रमा राठोड, भिकाभाई चव्हाण, गोविंद राठोड, साहेबराव राठोड, मोहन चव्हाण, विनोद राठोड, गिरजाबाई राठोड, तुकाराम चव्हाण, रेखा चव्हाण, साहेबराव चव्हाण, बाबुराव चव्हाण, सुगदेव चव्हाण, मांगू चव्हाण, बाबुराव चव्हाण, दीपक चव्हाण आदी शेतकर्यांची रब्बी हंगामाची पेरणीसुद्धा अद्याप झालेली नाही. तथापि, यावर्षी अत्यल्प पर्जन्यमानामुळे खरिपाची पिके वाचविण्यासाठी कालव्यात पाणी सोडण्यात आले होते. तत्पूर्वी पंप हाऊसद्वारे कालव्यात पाणी सोडण्याचे प्रात्यक्षिकही घेण्यात आले होते. त्यामुळे उपरोक्त लाभार्थी शेतकर्यांच्या जमिनीची अशीच दयनीय अवस्था होऊन खरिपातील पिकेदेखील नष्ट होऊन नुकसान सोसावे लागले. याबाबत शेतकर्यांनी वेळोवेळी तक्रार करून तसेच नुकसान भरपाई मागणी करूनही त्याची साधी दखलही घेतली जात नसल्याने या शेतकर्यांच्या हरित क्रांतीचे स्वप्न भंगले आहे. काम अपूर्ण असतानाही सर्व देयके निकाली मुख्य कालवा व उपसा सिंचन योजनेचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचे सिद्ध होऊन तसेच कालव्यावरील रोहडा फाट्यानजीक असलेले पाणी वळविण्याचे किंवा बंद करण्याचे गेट बसविले नसतानाही संबंधित ठेकेदाराने काम पूर्ण झाल्याचे दर्शवून प्रशासनाकडून सर्व बिले पास करून घेतली आहेत. रोहडा फाट्यानजीक कालव्यास गेट नसल्यामुळे पाणी सोडणे अथवा बंद करण्यासाठी कालव्यात प्रत्येक वेळी मुरूम टाकून बांध तयार करण्यात येतो त्यामुळे पाण्याचाही मोठय़ा प्रमाणावर अपव्यय होत असताना संबंधित बांधकाम ठेकेदाराकडून झालेल्या कामाची तपासणी न करता बिले पास केल्याचा प्रताप अधिकारी वर्गाने केला आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केल्या जात आहे.
६00 हेक्टर शेतात पाणी
By admin | Updated: December 11, 2015 02:37 IST