चिखली तालुक्यातील उंद्री जिल्हा परिषद गटाचे प्रतिनिधित्व विद्यमान आ. श्वेता महाले या करीत होत्या. विधानसभा निवडणुकीत त्या निवडून आल्याने त्यांनी जिल्हा परिषद सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यामुळे २०१९ च्या अखेरपासून येथील जिल्हा परिषद सदस्याचे पद रिक्त आहे. यासोबतच नांदुरा तालुक्यातील निमगाव जिल्हा परिषद गटातून विजयी झालेले मधुकर वडोदे यांचे अकाली निधन झाल्याने येथेही पोट निवडणूक घेणे गरजेचे झाले आहे. सध्या दोन्ही जिल्हा परिषद गट हे सदस्यांविना आहेत. मधल्या काळात कोरोनामुळे लॉकडाऊन लावण्यात आला होता. त्यानंतर अलीकडील काळात ग्रामपंचायतींच्या निवडणुका पारपडल्या. मात्र, या दोन्ही गटांची निवडणूक काही अद्याप घोषित झालेली नाही. त्यामुळे या दोन्ही जि. प. गटातील पोटनिवडणूक नेमकी कधी घोषित होते याकडे सध्या लक्ष लागून आहे. मलकापूर, चिखली विधानसभा मतदारसंघातील राजकारण्यांचेही या निवडणुकीकडे लक्ष लागून आहे.
गेल्या महिन्यात या दोन्ही जागांसाठी मतदार यादी कार्यक्रम जाहीर होऊन १८ फेब्रुवारीला प्रारुप मतदार यादीही प्रसिद्ध झाली होती. ५ मार्च रोजी ही यादी प्रमाणीत झाली असून, १० मार्च रोजी मतदान केंद्र व केंद्रनिहाय मतदारांची मतदार यादीही अंतिम करण्यात आली आहे. त्यामुळे या दोन्ही जि. प. गटांची लवकरच पोटनिवडणूक होईल, अशी अपेक्षा राजकीय व्यक्तींना आहे.
उंद्री जिल्हा परिषद गटामध्ये २६ हजार २२२ मतदार असून, ३८ मतदान केंद्र या गटात निश्चित करण्यात आली आहेत. निमगाव गटाची मतदारसंख्या २३ हजार ७४२ असून, ३६ मतदान केंद्र येथे आहेत.
त्यामुळे येथील पोटनिवडणूक कधी घोषित होते याकडे सध्या राजकीय वर्तुळाचे तथा प्रशासकीय यंत्रणेचे लक्ष लागून आहे.