देऊळगावराजा (जि. बुलडाणा): राज्य महामार्गावरील वळण रस्त्यावर समोरचे वाहन न दिसल्याने मोटारसायकल व प्रवासी वाहतूक करणार्या काळी-पिवळी टॅक्सीची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. डिगांबर विनायक काटे (वय २६) राहुल अंबादास पवार (वय ३५) अशी मृतकांची नावे आहेत. अपघात मंगळवारी सकाळी ११.३0 वाजेच्या दरम्यान देऊळगावराजा ते चिखली रोडवर असलेल्या असोला जहागीर फाट्यावर घडला. हिवरा गडलिंग जिल्हा परिषद मराठी प्राथमिक शाळेवर कार्यरत शिक्षक राहुल अंबादास पवार व डिगांबर विनायक काटे, रा.काटे पांगरी हे दोघेही परिवारासह साखरखेर्डा येथे राहतात. मंगळवारी सकाळी दोघे मित्र काही कामानिमित्त बजाज पल्सर मोटारसायकल एमएच २८ एफ ६६९३ वरुन देऊळगावराजाकडे येत होते. अवघे नऊ कि.मी. अंतर बाकी राहिले असताना असोला जहागीर फाट्यासमोरुन काळी-पिवळी टॅक्सी क्र.एम.एच.२८ एच २९४४ दे.राजावरून चिखलीकडे जात होती. रस्त्यावर समोरचे वाहन न दिसल्याने काळी-पिवळी टॅक्सी व मोटारसायकल यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. हा अपघात एवढा भीषण होता की, पल्सर मोटारसायकल टॅक्सीचे बोनट तोडून चेसीसपर्यंत घुसल्याने पल्सरचालक राहुल पवार यांच्या डोक्याला व पोटाला गंभीर मार लागल्याने त्यांचा जागेवरच मृत्यू झाला, तर मागे बसलेले डिगांबर विनायक काटे हे धडक होताच गाडीवरून हवेत उडून खाली रोडवर डोक्यावर पडल्याने त्यांच्या मेंदुला गंभीर दुखापत झाली. देऊळगावमही येथील सागर क्लॉथ सेंटरचे मालक हे कारने जालन्याला परिवारासह जात होते. त्यांनी वेळ न दवडता गंभीर जखमी डिगांबर काटे यांना दे.राजा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले; मात्र डॉ.संजय नागरे यांनी तपासून मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार कैलास ओहळ व कर्मचारी घटनास्थळी पोहोचले.
अपघातात दोन ठार
By admin | Updated: December 23, 2015 02:23 IST