लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: पेट्राेल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत असल्याने वाहनधारक चांगलेच हतबल झाले आहेत. इंधन दरवाढीचा जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवर परिणाम जाणवत असतानाच, ट्रॅक्टरची मशागतही महागली आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्ह्यातील शेतकरीही मेटाकुटीस येत असल्याचे दिसून येते.
कोरोनाच्या संकटातून सामान्य सावरत असतानाच सामान्यांना आता महागाईची झळ पोहोचत आहे. इंधनाच्या दरात गत काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. पेट्रोलचे दर शंभरीनजीक पोहोचले असून डिझेलच्या दरातही वाढ होत आहे. गत आठवड्यात डिझेलचे दर वाढल्यानंतर जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ होत असून, डिझेलचे दर वाढल्याने ट्रॅक्टर मशागतही महागली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता ट्रॅक्टरच्या मशागतीसाठी १५ ते २० टक्के अतिरिक्त मोजावे लागत आहे.
-------------
मशागतीचे दर (प्रति तास)
नांगरणी ४०० ५००
रोटा ५०० ८००
खुरटणी ४०० ५००
पेरणी ७०० ८००
पालाकुट्टी ४०० ५००
--------------
मशागतीचा एकरी ४५०० रुपये खर्च
१. डिझेलचे दर वाढल्यामुळे मशागतीच्या खर्चात सुमारे २० टक्के वाढ झाली आहे. कोरोना काळात उत्पन्नात घट झाली असतानाच, उत्पादन खर्च वाढल्याने शेतकरी त्रस्त झालेत.
२. ग्रामीण भागात मजूर मिळण्यास अडचणी निर्माण होतात. त्यामुळे अनेक शेतकरी ट्रॅक्टरने मशागतीला प्राधान्य देतात.
३. ट्रॅक्टरची मशागतही आता शेतकऱ्यांना खर्चिक ठरत असल्याचे चित्र ग्रामीण भागात दिसून येत आहे.
कोट...
- इंधनाचे भाव वाढल्यामुळे गत काही दिवसांत भांडवली खर्चात वाढ झाली आहे. परिणामी, शेती मशागतीच्या खर्चात किंचित वाढ केली आहे.
- संभाजी लांडे, ट्रॅक्टर मालक
--
शेतीची मशागत करताना मजुरांचा खर्च परवडेनासा झाल्यानंतर ट्रॅक्टर मशागतीचा विचार केला जायचा. मात्र, आता ट्रॅक्टरच्या मशागतीचा खर्चही शेतकऱ्यांच्या आवाक्याबाहेर जात आहे.
- संतोष गव्हाळे, शेतकरी
---
डिझेलचे दर वाढल्यामुळे ट्रॅक्टर मालकांनी मशागतीचे दर वाढविले आहेत. याचा फटका सामान्य शेतकऱ्यांना बसत आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी शेती पध्दती चांगलीच खर्चिक बनली आहे.
- महादेव कळसकार, शेतकरी