संग्रामपूर : अतिक्रमित जागेचा बनावट पट्टा तयार करून दिल्याप्रकरणी तत्कालीन तहसीलदार मोहन जाधव व लिपीक संजय पारखेडकर यांना शुक्रवारी स्थानिक न्यायालयाने एक वर्षाची सक्तमजुरी व प्रत्येकी १६ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.प्रल्हाद चितरंगे यांनी २0१२ मध्ये निवासी उपयोगासाठी, संग्रामपूर तालुक्यातील निमखेड शिवारातील अतिक्रमित जागेच्या पट्टय़ाची मागणी, तत्कालीन तहसीलदार मोहन जाधव यांच्याकडे केली होती. पट्टा देण्यासाठी त्यांना ४0 हजार रुपयांची लाच मागण्यात आली होती. चितरंगे यांनी त्यापैकी २0 हजार रुपये दिल्यानंतर, लिपिक संजय पारखेडकरने तहसीलदार मोहन जाधवच्या स्वाक्षरीनिशी बनावट पट्टा चितरंगे यांना तयार करुन दिला व उर्वरित २0 हजार रुपयांची मागणी केली. मिळालेला पट्टा बनावट असल्याचे लक्षात आल्यावर, चितरंगे यांनी तामगाव पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली; मात्र पोलिसांनी कोणतीही कारवाई न केल्याने, त्यांनी संग्रामपूर न्यायालयात खासगी फौजदारी तक्रार दाखल केली. न्यायालयाच्या आदेशानुसार, तहसीलदार आणि लिपिकाविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. सुनावणीदरम्यान दोघेही भारतीय दंड विधानाच्या कलम ४१८, ४२0, ४६५ व ४६६ अन्वये दोषी सिद्ध झाले. दंडाच्या रकमेपैकी १६ हजार रुपये फिर्यादी चितरंगे यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यास न्यायालयाने बजाविले आहे.
तहसीलदार व लिपिकास एक वर्षाची शिक्षा
By admin | Updated: June 21, 2014 00:00 IST