पैनगंगा नदीचे प्रदूषण रोका, निर्माल्य येथेच टाका!
By ब्रह्मानंद जाधव | Published: September 28, 2023 06:21 PM2023-09-28T18:21:03+5:302023-09-28T18:21:32+5:30
पैनगंगा नदी परिसर दणाणला बाप्पांच्या जयघोषाने.
ब्रह्मानंद जाधव, बुलढाणा : चिखली रोडवरील साखळी फाट्याजवळ पैनगंगा नदीवर गणरायांच्या विसर्जनासाठी भाविकांनी गुरुवारी दुपारपासून गर्दी केली आहे. या ठिकाणी वन्यजीव सोयरेच्या वतीने निर्माल्य कुंड उभारण्यात आले असून त्याला भाविकांचा प्रतिसाद मिळत आहे. पैनगंगा नदी परिसर बाप्पांच्या जयघोषाने दणाणला आहे. पैनगंगा नदीचे प्रदूषण रोका, निर्माण येथेच टाका अशा घोषणा यावेळी दिल्या जात आहेत.
गणरायांच्या विसर्जनासाठी दुपारपासून मिरवणूक निघाले आहेत. घरगुती बाप्पांच्या विसर्जनासाठी सुद्धा पैनगंगा नदी परिसरात भाविकांनी गर्दी केली आहे. येथील ज्ञानगंगा अभयारण्यात सातत्याने कार्य करणाऱ्या वन्यजीव सोयरे, बुलढाणा यांनी पैनगंगा नदी लगत पुलावर तयार केलेल्या निर्माल्य कुंडला भाविकांनी बाप्पाला निरोप देत भरभरून प्रतिसाद दिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातून जाणाऱ्या पैनगंगा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी तसेच पैनगंगा अभयारण्यातील वन्यजीवांना या प्रदूषनाने होत असलेले धोके लक्षात घेवून मौजे साखळी फाट्याजवळ पैनगंगा नदीलगत असलेल्या पुलाजवळ निर्माल्य वस्तु एकत्रित जमा करुन नदीचे प्रदूषणापासुन मुक्तता करण्यासाठी वन्यजीव सोयरे यांच्या कडून पूला जवळ तातपुरते निर्माल्य कुंड २४ सप्टेंबर २०२३ रोजी तयार करण्यात आले.
नुकते हरतालिका आणि गौरी पूजन झाले तसेच २३ सप्टेंबर रोजी गणपती विसर्जना दरम्यान बाप्पाला निरोप देत या दरम्यान भाविकांनी दिलेल्या भरभरून प्रतिसाद दिल्यामुळे वन्यजीव सोयरे भावूक झाले असून पुढील काळात असाच प्रतिसाद नवरात्र दरम्यान भाविक देतील अशी आशा वन्यजीव सोयरे कडून केली जात आहे. वन्यजीव सोयरे यांनी तयार केलेल्या निर्माल्य कुंडला बुलढाणा तहसीदार रूपेश खंडारे आणि वन्यजीव सोयरे तथा नायब तहसीलदार प्रकाश डब्बे यांनी भेट देऊन निर्माल्य कुंडची पाहणी केली. येत्या काळात नवरात्रात देवीचे विसर्जन होणार आहे.
देवी विसर्जनाच्या वेळी निर्माल्य विसर्जीत करतात. गणपती विसर्जनाला जसा प्रतिसाद भाविक भक्तांनी निर्माल्य कुंडला दिला तसाच प्रतिसाद नवरात्र दरम्यान देवी विसर्जनाच्या वेळी द्यावा व निर्माल्य वस्तू भाविकांनी वन्यजीव सोयऱ्यांनी तयार केलेल्या निर्माल्य कुंडमध्ये टाकून सहकार्य करावे, असे आवाहन वन्यजीव सोयरे नितिन श्रीवास्तव यांनी केले आहे.