कोरोनामुळे उत्पन्न घटलेले एसटी महामंडळ आता हळूहळू पूर्वपदावर येत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होत नव्हते आणि वैद्यकीय बिलेही नियमित मिळत नसल्याने अनेकांची निराशा होत होती. यासंबंधी अनेकांनी वरिष्ठांकडे पगार वेळेवर करा, अशीही मागणी केली होती. यासंबंधी विभाग नियंत्रक संदीप रायलवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, बुलडाणा विभागातील सर्वच एसटी कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार पाच दिवसांच्या अंतराने जमा करण्यात आले आहेत. तर सोबतच सर्वच कर्मचाऱ्यांना नियमित वैद्यकीय बिले दिले जात असल्याची माहितीही त्यांनी दिली.
जिल्ह्यात एकूण आगार ७
चालक ९७५
वाहन ८५०
अधिकारी ९
कर्मचारी २५००
आता नियमित मिळतात वैद्यकीय बिले
कोरोनाकाळात आर्थिक डबघाईस आलेल्या एसटी महामंडळातील चालक-वाहकांचे वैद्यकीय बिले नियमित मिळत नसल्याचे चित्र होते. आठ-आठ महिने या बिलांसाठी वाट पाहावी लागत असे. मात्र, मागील काही दिवसांपासून ही वैद्यकीय बिले कधी निधीअभावी एक दोन दिवस उशिराने का होईना. मात्र, आता नियमित मिळत असल्याची माहिती देण्यात आली आहे.
पाच दिवसांच्या फरकाने मिळाले दोन्ही पगार
विभागातील एसटी कर्मचाऱ्यांचे दोन महिन्यांचे पगार रखडले होते. ते दोन्ही महिन्यांचे पगार सप्टेंबरमध्ये पाच दिवसांच्या फरकाने जमा करण्यात आले आहेत. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये आनंद असल्याचे दिसून येत आहे.
विभागातील सर्वच कर्मचाऱ्यांचे रखडलेले पगार जमा करण्यात आले आहेत. आता महामंडळ पूर्वपदावर येत असून, कर्मचाऱ्यांना कोणतीच अडचण जाणार नाही यासाठी वरिष्ठ पातळीवरून प्रयत्न केले जात आहेत.
- संदीप रायलवार, विभाग नियंत्रक, बुलडाणा