सिंदखेडराजा (बुलडाणा) : तालुक्यातील शेवगा जहागिर व गुंजमाथा शिवारात सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याने दोन शेतकर्यांचे ८0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास अज्ञात इसमाने आग लावल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. शेवगा जहागिर शिवारात असलेल्या अडीच एकर शेतातील सोयाबीनची सोंगणी करून जगन्नाथ पुंजाजी गिर्हे यांनी ढीग लावून ठेवला होता. अज्ञात इसमाने या सोयाबीनच्या ढिगाला आग लावली. त्यामुळे संपूर्ण सोयाबीन जळून खाक झाले. त्यामध्ये जगन्नथ गिर्हे यांचे ५0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यांनी यासंदर्भात साखरखेर्डा पोलिस ठाण्याला फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला आणि पुढील तपास हाती घेतला आहे. गुंजमाथा शिवारातही सोयाबीनच्या गंजीला आग लागल्याची घटना घडली आहे. साखरखेर्डा येथील शांताबाई तुकाराम बेंडमाळी यांचे गुंजमाथा शिवारात दीड एकर शेत आहे. त्यांनी आपल्या शेतात पेरलेल्या सोयाबीनची कापणी करुन शेतातच गंजी लावली होती. दरम्यान, दिवाळीच्या दुसर्या दिवशी सायंकाळच्या सुमारास त्यांचा मुलगा बळीराम बेंडमाळी हे शेतात गेले असता, सोयाबीनची गंजी जळून खाक झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. यात बेंडमाळी यांचे ३0 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे. बळीराम बेंडमाळी यांनी सदर घटनेची माहिती तलाठी डहाके यांना दिली तसेच साखरखेर्डा पोलिस ठाण्यालाही फिर्याद दिली आहे. पुढील तपास पोलिस करीत आहेत. सोयाबीन जळाल्याच्या घटना जिल्ह्यात मोठय़ा प्रमाणात घडत आहेत. त्यामुळे शेतकर्यांपुढे उदरनिर्वाहाचाच प्रश्न निर्माण झाला आहे.
सोयाबीन गंजीला आग ८0 हजारांचे नुकसान
By admin | Updated: October 26, 2014 23:40 IST