मेहकर : येथील पोस्ट ऑफिसमध्ये वारंवार लिंक फेल होत असल्यामुळे नागरिकांचे व्यवहार ठप्प होत आहेत. त्यामुळे विद्यार्थी व नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. पोस्ट ऑफिसमधील इंटरनेट सेवा सुरळीत करावी, अशी मागणी काँग्रेसचे नेते ॲड. शैलेश देशमुख यांनी २० मार्च रोजी निवेदनाद्वारे संबंधित पोस्ट मास्तर यांच्याकडे केली आहे.
बुलडाणा जिल्ह्यामध्ये खामगाव, बुलडाणा या पोस्ट ऑफिसनंतर मेहकर येथील पोस्ट ऑफिसचा कारभार तिसऱ्या क्रमांकावर येतो. या पोस्ट ऑफिसमध्ये मेहकर शहर व परिसरातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची बचत खाती उघडण्यात आली आहेत. मेहकर शहरातील पोस्ट ऑफिस अद्ययावत असल्यामुळे या पोस्ट ऑफिसमध्ये अनेक खातेदार आर्थिक व्यवहारांची उलाढाल नियमितपणे करतात. त्यामुळे मेहकर शहरातील पोस्ट ऑफिस हे बुलडाणा जिल्ह्यात उत्कृष्ट कामात तिसऱ्या क्रमांकावर आहे. परंतु, गेल्या काही दिवसांपासून या कार्यालयाची लिंक वारंवार फेल होत असल्यामुळे ग्राहकांची तारांबळ उडत आहे. त्यामुळे संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या बाबीकडे लक्ष देऊन पोस्ट ऑफिसमधील लिंक सुरळीत करावी, जेणेकरून ग्राहकांना त्रास होणार नाही, अशी मागणी काँग्रेसचे नेते ॲड. देशमुख यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
मेहकर शहरातून गेल्या काही महिन्यांपासून रस्त्याचे काम सुरु असल्याने इंटरनेट कनेक्शन वारंवार खंडित होत होते. परंतु, आता रस्त्याचे काम पूर्ण होत असल्यामुळे यापुढे अशाप्रकारचा कुठलाही त्रास ग्राहकांना होणार नाही. कुठलीही अडचण असल्यास ग्राहकांनी थेट संपर्क साधावा.
- आशिष इंगळे, पोस्ट मास्तर, मेहकर.