लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: आगामी काळात बुलडाणा तालुक्यातील ५१ आणि मोताळा तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीवर शिवसेनेने विशेष लक्ष केंद्रीत केले असून त्यानुषंगाने आ. संजय गायकवाड यांच्या जनसंर्प कार्यालयावर एक महत्त्वपूर्ण बैठक सहा नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. दरम्यान, या ग्रामपंचायतींवर भगवा फडकविण्याचे आवाहन आ. संजय गायकवाड यांनी करत ज्या ग्रामपंचायतींची निवडणूक अविरोध होईल. त्या ग्रामपंचायतींना विकास कामासाठी एक कोटी रुपयांचा विकास निधी मिळून देण्यास आपण प्राधान्य देवू अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे आगामी काळात होणाऱ्या जिल्ह्यातील ५२६ ग्रामपंचायतींची निवडणूक आता चर्चेत आली आहे.आगामी काळात बुलडाणा आणि मोताळा तालुक्यातील १०४ ग्रामपंचायतींची निवडणूक होत आहे. त्यानुषंगाने शिवसेनेने या निवडणुकीवर लक्ष केंद्रीत केले असून अधिकाधिक ग्रामपंचायतीवर शिवसेनेचा भगवा फडकावा या दृष्टीकोणातून आतापासून प्रयत्न सुरू केलेले आहेत. या बैठिकस शिवसेनेचे जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, उपजिल्हा प्रमुख भोजराज पाटील, तालुका प्रमुख लखन गाडेकर, मोताळा तालुका प्रमुख रामदास चौथनकर, युवा नेते मृत्युंजय गायकवाड, बाळासाहेब नारखेडे, युवा सेनेचे उपजिल्हा प्रमुख प्रविण निमकर्डे यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना आ. गायकवाड म्हणाले की, लवकरच ग्राम पंचायतीच्या निवडणूका होणार आहेत. या निवडणुकीकरीता आतापासून प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज राहून या ग्रामपंचायती शिवसेनेच्या ताब्यात कशा येतील यास प्राधान्य द्यावे, असे ते म्हणाले. सोबतच आपसातील मतभेद विसरून एक दिलाने व एक जिवाने शिवसेना पक्षाचे काम निष्ठेने करण्याचे आवाहन त्यांनी केली. सोबतच बुलडाणा विधानसभा मतदार संघातील सर्वच ग्राम पंचायतीवर शिवसेनचा भगवा फडकला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. तसेच ग्रामस्थांनी एकत्र येवून निवडणुका अविरोध करण्यास प्राधान्य द्यावे, असे आवाहन केले. अविरोध निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींना आपण शासनस्तरावरून एक कोटी रुपयांचा विकास निधी मिळवून देवू असे वक्तव्य त्यांनी यावेळी केली. यावेळी उपस्थित शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंधर बुधवत, उपजिल्हा प्रमुख भोजरा पाटील यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
शिवसेने केले ग्रामपंचायत निवडणुकीवर लक्ष केंद्रीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2020 12:07 IST