शेगाव : शेगाव शहरात दारूबंदी करण्याचा ठराव मंगळवारी नगरपरिषदेच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला. शेगाव येथे दारूबंदी करण्यात यावी, अशी अनेक दिवसांची मागणी होती. या पृष्ठभूमीवर नगराध्यक्ष शारदा कलोरे यांनी मंगळवारी सायंकाळी चार वाजता नगर परिषदेची विशेष सभा बोलावली होती. या सभेमध्ये काँग्रेसच्या ब गटातील चार व भाजप सेनेचे ९ सदस्य उपस्थित होते. काँग्रेस पक्षाचे ११ सदस्य या विशेष सभेला अनुपस्थित होते. नगराध्यक्ष शारदा कलोरे यांनी शहरात दारूबंदी व्हावी, असा ठराव मांडला. सभेत तो सर्वांनुमते मंजूर केला. यावेळी मुख्याधिकारी टी.जी. मुलानी सह न.प.तील अधिकारी वर्ग यावेळी उपस्थित होते.
दरम्यान शेगाव न.प.चे मुख्याधिकारी टी.जी. मुलाणी यांनी नगर परिषद हद्दीतील दारूची दुकाने बंद करण्याबाबत असा ठराव कायदेशीरदृष्ट्या योग्य नसल्याचे म्हटले. नगर परिषद अधिनियम १९६५ नुसार असा ठराव घेता येत नसल्याचे स्पष्ट करून घेतलेला ठराव हा फक्त भावना व्यक्त करण्यासाठी होऊ शकतो, असे ते म्हणाले.
* विशेष सभेचे आयोजनावर आक्षेप
नगराध्यक्षाने बोलावलेल्या विशेष सभेची नोटीस आपल्याला तीन दिवसापूर्वी मिळणे बंधनकारक आहे. परंतु मंगळवारच्या सभेची नोटीस वेळेत मिळाली नसल्याने सदर विशेष सभा ही रद्द करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसचे गटनेते शिवाजी बुरुंगले व नगरसेविका वंदना वानखडे आणि काँग्रेसचे गटनेते शिवाजी बुरुंगले यांनी मंगळवारी सकाळी केली होती. मात्र, त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करुन ही सभा पार पडली.