डोणगाव (जि.बुलढाणा): समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एक जण ठार, तर एक जण जखमी झाल्याची घटना १५ फेब्रुवारी रोजी रात्री घडली. हा अपघात डोणगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील चॅनल क्रमांक २६८ जवळ झाला.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अब्दुल करीम अब्दुल कलीम (वय २५, ट्रक चालक, रा. मगनगंज, ता. गोसाईगंज, जि. सुलतानपूर, उत्तर प्रदेश) यांनी त्यांचे वाहन (क्रमांक एमएच-०४ केएफ ०१५३) समृद्धी महामार्गावरील भारत पेट्रोल पंपाजवळ इंडिकेटर लावून थांबवले होते. याच वेळी मागून भरधाव वेगाने आलेल्या पिकअप वाहनाने (क्रमांक एमपी-०४ जीबी ७१५८) जोरदार धडक दिली.
या अपघातात पिकअप वाहनाचा चालक अमन धुलचंद सैनी (रा. भोपाल) जखमी झाला, तर त्याच्यासोबत असलेला प्रवासी रवि रामकीसन अहीरवाल (रा. इस्लामनगर, बेरसिया रोडगंज, भोपाल) याचा मृत्यू झाला. अपघातामुळे ट्रकचेही मोठे नुकसान झाले.
या प्रकरणी फिर्यादीच्या तक्रारीवरून डोणगाव पोलीस ठाण्यात पिकअप चालक अमन धुलचंद सैनी याच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम १०६(१), २८१, ३२४(४) बीएनएस नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार संजय धिके करत आहेत.
समृद्धी महामार्गावरील ट्रक थांबे अपघातांना निमंत्रण
समृद्धी महामार्गाच्या डोणगाव परिसरात स्थानिक पेट्रोल पंप आणि हॉटेलांमुळे महामार्गाच्या कडेला ट्रक मोठ्या संख्येने थांबतात. परिणामी, महामार्गावर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
या बाबीकडे महामार्ग पोलीस आणि स्थानिक पोलीस दुर्लक्ष करत असल्याचा आरोप होत आहे. वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास भविष्यात मोठ्या दुर्घटनांना सामोरे जावे लागू शकते.