सुधीर चेके पाटील
चिखली : राज्यभरात गणरायापाठोपाठ आज गौराईचेही घरोघरी शुभागमन झाले आहे. महाराष्ट्रात गौरी आगमन ते विसर्जन हा तीन दिवसांचा सण साजरा होत असताना स्थळपरत्वे गौरींच्या पूजेची पद्धत आणि परंपरा भिन्न असल्या तरी सर्वत्र ज्येष्ठा आणि कनिष्ठा याप्रमाणे दोन गौराईची स्थापना या काळात केल्या जाते. मात्र, केवळ एकाच गौरीचे आवाहन, पूजन आणि विसर्जन करण्याची अनोखी परंपरा सुमारे दीडशे वर्षांपासून बुलडाणा जिल्ह्यातील एकलारा (ता. चिखली) येथील पानगोळे कुटुंब जोपासत आहे.
चिखली तालुक्यातील एकलारा येथील पानगोळे परिवाराद्वारे गेल्या सुमारे दीडशे वर्षांपासून केवळ एकाच गौरीचे आवाहन, पूजन आणि विसर्जन केल्या जात आहे. यामागची कथा मोठी रंजक आहे. या परिवारातील पूर्वज अश्रूजी सखाराम पानगोळे यांच्या काळात सुमारे दीडशे वर्षांपासून गौराईची पारंपरिक पद्धतीने व सर्वसामान्यपणे दोन गौराईंची स्थापना करण्यात आली होती. स्थापनेनंतर रात्रीच्यावेळी दोन गौरींपैकी एक अज्ञाताने चोरून नेली. दरम्यान, ही बाब समजल्यानंतर अश्रूजी पानगोळे यांनी घरात राहिलेल्या एका गौरीचीच मनोभावे पूजा व इतर विधी करताना दुसरी गौरी जोपर्यंत परत सापडत नाही तोपर्यंत एकाच गौरीची स्थापना करू, अन्यथा यापुढेही एकाच गौरीची स्थापना करू, असा प्रण केला. त्यापश्चात चोरट्यांचा शोधही घेतला मात्र घरात मनोभावे स्थापन केलेली गौरी चोरून नेत असताना चोरट्यांनी दोन्ही गौरींची चोरी न करता केवळ एकच गौरी का चोरली असावी, याचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. परिणामी गौरीची आराधना करतानाच आपल्या पूर्वजांनी घेतलेला पण याचा मान राखत पाळगोळे परिवारातील सर्वांनी हा वारसा जोपासला. सद्यस्थिती विठ्ठल त्र्यंबक पानगोळे यांच्या घरी आजही त्या एकाच गौराईचे आवाहन, पूजन आणि विसर्जन करण्याची परंपरा जोपासली जात आहे.
एकच गौर बसविण्याचे प्रमाण अगदीच नगण्य !
महाराष्ट्रात सर्वत्र गौरी पुजताना प्रामुख्याने गौराईच्या बहिणींच्या जोडीचीच स्थापना केली जाते. यामध्ये एक बहीण मोठी, एक छोटी. ‘ज्येष्ठा आणि कनिष्ठा’, असे स्वरूप असते. तर राज्यात एकच गौर बसविण्याचे प्रमाण राज्यात अगदीच नगण्य मानले जाते. त्यामुळे आपल्या पूर्वजांचा प्रण आणि वडिलोपार्जित वसा जोपासत एकच गौर बसविण्याच्या एकलारा येथील पानगोळे परिवाराची ही परंपरा अनोखी व राज्यातील एकमेव मानली जात आहे.
धातूच्या मुखवट्याचे जतन !
सुमारे दीडशे वर्षांपासून चोरी झाल्यानंतर उरलेल्या एका गौरीचा धातूचा मुखवटा आजही पानगोळे परिवाराने जतन करून ठेवला आहे. परंपरागतपणे धातूचा मुखवटा बसवून त्यांचा साज-शृंगार केला जातो. कालपरत्वे साज-श्रुंगाराच्या इतर साहित्यात बदल झाला असला तरी मुखवटा मात्र आजही तोच आहे. हा मुखवटा पंचधातूचा असावा, असा कयास लावण्यात येतो.