२५ किलो बियाण्यांच्या भावात एक क्विंटल सोयाबिनची विक्री; जगावे तरी कसे? शेतकऱ्यांंचा प्रश्न

By विवेक चांदुरकर | Published: December 27, 2023 05:07 PM2023-12-27T17:07:13+5:302023-12-27T17:08:43+5:30

शेतकर्यांना पेरणीच्यावेळी चांगल्या कंपनीचे २५ किलो बियाणे तब्बल ४ हजार ते ४२०० रूपयांमध्ये विकत घ्यावे लागत आहे.

Sale of one quintal of soybeans at the price of 25 kg of seeds How to live question by farmers to government | २५ किलो बियाण्यांच्या भावात एक क्विंटल सोयाबिनची विक्री; जगावे तरी कसे? शेतकऱ्यांंचा प्रश्न

२५ किलो बियाण्यांच्या भावात एक क्विंटल सोयाबिनची विक्री; जगावे तरी कसे? शेतकऱ्यांंचा प्रश्न

विवेक चांदूरकर, खामगाव : शेतकर्यांना पेरणीच्यावेळी चांगल्या कंपनीचे २५ किलो बियाणे तब्बल ४ हजार ते ४२०० रूपयांमध्ये विकत घ्यावे लागत आहे. तर सध्या सोयाबिनच्या भावात घट झाली असून शेतकर्यांना केवळ ४ हजार ते ४५०० रूपयांमध्ये एक क्विंटल सोयाबिन विकावे लागत आहे. उत्पादन खर्चापेक्षाही कमी उत्पन्न झाल्याने जगावे तरी कसे? असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

सोयाबिन जिल्ह्यातील प्रमुख पीक आहे. यावर्षी जिल्ह्यात ७ लाख २५ हजार ५२१ क्षेत्रापैकी तब्बल ४ लाख १८ हजार १२८ हेक्टरवर सोयाबिनची पेरणी करण्यात आली आहे. खरीप हंगामात उशीरा पाऊस झाल्याने पेरणी लांबली. त्यानंतर अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकर्यांच्या शेतातील मातीसह पीक वाहून गेले. सोयाबिनवर विविध किडींनी आक्रमण केले. यावर्षी उत्पादनात प्रचंड घट आली आहे. शेतकर्यांना तीन ते चार क्विंटल उत्पादन झाले. त्यातही सध्या अल्प भाव मिळत आहे. शेतकर्यांना चांगल्या कंपनीचे २५ किलो बियाणे ४ हजार ते ४२०० रूपयांना विकत घ्यावे लागते. तर अन्य कंपन्यांचे बियाण्यांचे भावही ३ हजार ते ३५०० रूपये आहे. त्यानंतर एका एकरासाठी नागरटी ५०० रूपये, पेरणीचे मजुरी ५०० रूपये, खत १५०० रूपये, तणनाशक १ हजार, किटकनाशक १ हजार, सोंगणी २५०० रूपये, काढणीचा २५०० रूपये खर्च येतो.

 शेतमाल विक्रीसाठी बाजारात नेण्याकरिता याचा खर्चही मोठ्या प्रमाणात असतो. त्यामुळे शेतकर्यांना एका एकराचा उत्पादन खर्चच १५ हजार रूपये आहे. तर एका एकरात चार क्विंटल उत्पादन झाले तर १८ हजार रूपये उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे वर्षभर अपार श्रम करून शेतकर्यांना फक्त ३ हजार रूपयेच एका एकरातून उरत आहेत.

एका एकराला लागणारा खर्च:

नागरटी ५०० रूपये
बियाणे ३००० ते ४००० रूपये
खत १५०० रूपये
नणनाशक १००० रूपये
किटकनाशक १००० रूपये
साेंगणी २५०० रूपये
काढणी २५०० रूपये
शेतमाल विक्रीसाठी वाहन भाडे १००० रूपये
एकूण १३००० ते १४००० रूपये

सोयाबीनच्या भावात सातत्याने घट :

सोयाबीनच्या भावात गत दोन महिन्यात सातत्याने घट होत आहे. २८ ऑगस्ट रोजी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ४९०० ते ४३०० रुपये दर होते. या दिवशी १५ हजार ९६७ क्विंटल आवक झाली होती. तर २८ नोव्हेंबर रोजी ५०५० ते ३९०० रुपये दर होते. या दिवशी ४७४१ क्विंटल आवक झाली होती. २६ डिसेंबर रोजी खामगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ४८०० ते ४२०० रुपये भाव होते. ५३३९ क्विंटल आवक झाली. गत एक महिन्यातच दोनशे रुपयांनी भाव घसरले.

सोयाबीनला नगदी पीक म्हटल्या जाते. सोयाबीनला यावर्षी अल्प भाव आहे. उत्पादनही खर्चही निघत नाही. त्यामुळे मुलांचे शिक्षण कसे करावे, आरोग्याच्या समस्या उद्भवल्यास कुणाला पैसे मागावे, महागाई प्रचंड वाढली आहे. त्यामुळे जगावे तरी कसे? असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Web Title: Sale of one quintal of soybeans at the price of 25 kg of seeds How to live question by farmers to government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.