परतीचा पाऊस; खरीप पीकाचे ५० टक्के नुकसान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 02:03 PM2019-10-30T14:03:58+5:302019-10-30T14:04:11+5:30

परतीच्या पावसामुळे यापैकी निम्म्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Return rain 50 percent loss of kharif crops in Buldhana | परतीचा पाऊस; खरीप पीकाचे ५० टक्के नुकसान!

परतीचा पाऊस; खरीप पीकाचे ५० टक्के नुकसान!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
बुलडाणा: नेमक्या सोंगणीच्या हंगामात परतीच्या पावसाने कहर केल्याने बुलडाणा जिल्ह्यातील खरीपातील पिकांचे ५० टक्क्यापेक्षा अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी कार्यालयाने व्यक्त केला असून येत्या चार दिवसात या नुकसानाचे युद्धस्तरावर पंचनामे करून तसा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास सादर करण्यात येणार असल्याचे संकेत सुत्रांनी दिले आहेत.
जिल्ह्यात गेल्या दहा दिवसात वार्षिक सरासरीच्या ९ टक्के परतीचा पाऊस झाला आहे. जेथे आॅक्टोबर हीट खरीपाची तयार झालेली पिके सुकण्यासाठी महत्त्वाचा असतो. त्याच काळात नेमका परतीचा पाऊस आल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बहुतांश भागात सोंगून ठेवलेल्या पिकांना चक्क कोंब आले आहेत. पावसामुळे शेतातच आडवे पडलेल्या ज्वारीच्या कणसांनाही कोंब आल्याने शेतकरी वर्ग मोठा अडचणीत आला आहे. २०१३-१४ हे वर्ष वगळता जिल्ह्यात सातत्याने अवर्षण व अवर्षणसदृश्य स्थिती निर्माण होत आहे. यावर्षी मात्र वार्षिक सरासरीच्या १३ टक्के पाऊस जादा पडला आहे. मात्र शेवट्या टप्प्यात परतीच्या पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावल्या गेला. जिल्ह्यात सात लाख २९ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर दरवर्षी खरीपाची पेरणी होत असते.
यंदा वेळेत व नियमित स्वरुपात पाऊस पडला. नजर अंदाजमध्येही जिल्ह्याची पैसेवारी ही ७१ पैश्याच्या आसपास आली आहे. आता परतीच्या पावसामुळे सुधारीत पैशेवारीमध्ये काय फरक पडतो याकडे प्रशासनाचे लक्ष लागून आहे.
सुधारीत पैसेवारीला गेल्या आठ दिवसात झालेल्या पावसामुळे मोठा फटका बसू शकतो, असाही अंदाज व्यक्त होत आहे. जिल्ह्यात प्रामुख्याने खरीपात सोयाबीन तीन लाख ६१ हजार ५३५ हेक्टरवर, दोन लाख १३ हजार १८७ हेक्टरवर कपाशी, एक लाख ४८२ हेक्टरवर ज्वारी, ७६ हजार ५०७ हेक्टरवर तूर आणि २५ हजार ४० हेक्टरवर मका पीकाचा पेरा झाला होता परतीच्या पावसामुळे यापैकी निम्म्या पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
परतीच्या पावसापूर्वी शेतकºयांनी सोयाबीनसह उडीद, मूगासह अन्य पीके सोंगून शेतातच सुडी लावून ठेवली होती. पावसामुळे ही पीके खराब झाली असून बुहतांश पिकांना कोंब फुटल्यामुळे शेतकºयांना मोठा फटका बसला आहे.

रब्बीवर शेतकºयांची भिस्त
खरीपाचे हातातोंडाशी आलेल पीक हातचे गेल्यामुळे शेतकरी हवालदील आहे. मात्र वार्षिक सरासरीच्या ११३ टक्के पाऊस झालेल्या बुलडाणा जिल्ह्यात रब्बीचे पीक चांगले येण्याचा अनुमान असून त्यादृष्टीने शेतकºयांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. ऐरवी रब्बीचा जमीनीतील ओलाव्याचा आधार घेत शेतकरी जुगार खेळत होता. आता हे पीक चांगले येईल अशी आस शेतकºयांना असल्याचे चित्र आहे. पीक विम्या सोबतच राष्ट्रीय आपत्ती निवारण कोषातूनही शेतकºयांना येत्या काळात मदत मिळण्याचे संकेत जिल्ह्याचे काळजीवाहू पालकमंत्री डॉ. संजय कुटे २८ आॅक्टोबर रोजीच दिले आहेत. दरम्यान, रब्बीचा पेराही यंदा वाढण्याची आशा प्रशासनाला आहे.


परतीच्या पावसामुळे पिकांचे झालेले नुकसान पाहता प्राथमिक अंदाज घेण्यात आला असून जवळपास ५० टक्के पिकांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. येत्या चार दिवसात पीक नुकसानाचा पंचनामा पूर्ण करण्यास प्राधान्य देण्यात येत आहे.
-नरेंद्र नाईक,
जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलडाणा

 

Web Title: Return rain 50 percent loss of kharif crops in Buldhana

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.