बुलडाणा : अखिल महाराष्ट्र आदिवासी आरक्षण बचाव संघर्ष समितीच्या वतीने सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. आदिवासी जमातीच्या नावाने महाराष्ट्रात बोगस आदिवासीची घुसखोरी सुरू आहे ती त्वरित थांबवावी, मराठवाड्यातील मद्मोनवार, कापेवार तसेच कोळी जाती व इतर गैरआदिवासींना औरंगाबाद येथील जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने निर्गमित केलेली जात प्रमाणपत्रे त्वरित रद्द करावे तसेच सर्वच वैधता प्रमाणपत्रांची पुन्हा पडताळणी करावी व त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावे. तसेच गैरआदिवासींना खोटे प्रमाणपत्र ज्यांनी दिले व ज्यांनी घेतले अशावर फौजदारी कारवाई करावी, कोणत्याही खर्या आदिवासींची मागणी नसताना स्थापन झालेली औरंगाबाद येथील समिती बरखास्त करण्यात यावी. या व इतर मागण्यांसाठी जिल्हधिकारी कार्यालयावर हा मोर्चा नेण्यात आला होता. याशिवाय आदिवासी विभागाचे आयुक्त संभाजीराव सरकुंडे यांच्यावर बोगस आदिवासींमार्फत करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्याचासुद्धा यावेळी निषेध करण्यात आला. यावेळी माजी जि.प. अध्यक्ष भास्कर ठाकरे, जि.प. सदस्य कैलास चवरे, सुगदेवराव डाबेराव, गजानन सोळंके, विनोद डाबेराव, नंदिनी टापरे, नितीन मसराम उपस्थित होते.
आरक्षण बचाव समितीचा मोर्चा
By admin | Updated: February 3, 2015 00:18 IST