लोकमत न्यूज नेटवर्कधाड: रुईखेड मायंबा येथील महिलेला मारहाण करणाऱ्या २३ आरोपींना १२ जून रोजी जिल्हा सत्र न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना जामीन नाकारला. रुईखेड येथे एका महिलेला मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी २३ जणांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. त्यानंतर सदर प्रकरण संपूर्ण राज्यात गाजत असून, या गंभीर घटनेची दखल घेत सामाजिक मंत्र्यांसह अनुसूचित जाती-जमाती आयोगाचे अध्यक्ष यांनी भेटी देऊन माहिती घेतली. या घटनेचा विशेष तपास करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी उपविभागीय पोलीस अधिकारी डी.बी. महामुनी यांच्या नेतृत्वात एक पथक स्थापन करून तपास यंत्रणा मार्गी लावली. या घटनेतील २३ आरोपींना न्यायालयाने सुरुवातीला पोलीस कोठडीचा आदेश दिले होते. त्यानंतर त्यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. १२ जून रोजी २३ आरोपींना पोलिसांनी पुन्हा न्यायालयासमोर हजर केले असता आरोपींनी जामीन मिळावा म्हणून विनंती अर्ज केला. त्यावर न्यायालयाने सर्व आरोपींचा जामीन नामंजूर करत त्यांना न्यायालयीन कोठडीचे आदेश दिले. सरकार पक्षाकडून अॅड. अमोल बल्लाळ यांनी व डीवायएसपी बी.बी. महामुनी यांनी प्रयत्न केले.
रुईखेड मायंबा घटनेतील आरोपींचा जामीन नामंजूर
By admin | Updated: June 14, 2017 01:29 IST