ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रश्न कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 5, 2019 02:03 PM2019-11-05T14:03:10+5:302019-11-05T14:03:45+5:30

दिवाळीच्या आधी मानधन व्हावे, ही अपेक्षा होती; परंतु दिवाळी झाल्यानंतरही त्यांना मानधन मिळालेले नाही.

The question of Honorarium for village employment servants remains | ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रश्न कायम

ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रश्न कायम

googlenewsNext

- देवेंद्र ठाकरे
लोकमत न्यूज नेटवर्क
खामगाव : ग्रामीण भागात गाव स्तरावर काम करणाऱ्या ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रश्न अद्यापही सुटलेला दिसत नाही. निदान दिवाळीच्या आधी मानधन व्हावे, ही अपेक्षा होती; परंतु दिवाळी झाल्यानंतरही त्यांना मानधन मिळालेले नाही. त्यामुळे रोजगार सेवकांमध्ये रोष व्यक्त होत आहे.
खामगाव तालुक्यात एकूण ९७ ग्राम रोजगार सेवक काम करतात. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत करण्यात येणारी कामे पुर्ण करून घेण्यात ग्राम रोजगार सेवकांची महत्वाची भुमिका असते. ग्राम रोजगार सेवकांना कामाचे स्वरूप पाहून मानधन ठरविण्यात येते. गाव पातळीवर घरकूल बांधकाम, वृक्ष लागवड, तुती लागवड, विहिरी यासह विविध कामे करून घेण्यासाठी ग्राम रोजगार सेवक योगदान देतात. दरम्यान खामगाव तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांना गत जानेवारी महिन्यापासून मानधन मिळाले नसल्याचे रोजगार सेवकांचे म्हणने आहे. निदान दिवाळीपुर्वी तरी मानधन होईल, अशी अपेक्षा असताना त्यांच्या आशेवर पाणी फेरल्या गेले आहे. रोजगार सेवकांची दिवाळीही अंधारातच गेली आहे. याआधी तत्कालीन बीडीओ यांना निवेदन देऊन मानधन देण्याची मागणी रोजगार सेवकांनी केली होती, परंतु यावरही काही झाले नाही. त्यानंतर महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचे सहाय्यक कार्यक्रम अधिकारी गौरव खोडके व गटविकास अधिकारी राजपूत यांच्या कानावरही मानधनाचा विषय घालण्यात आला.
परंतु निधी उपलब्ध नसल्याचे कारण देत अद्यापही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचे दिसून येते. एकीकडे तोकड्या मानधनावर काम करावे लागत असताना, रक्कम वेळेवर मिळत नसल्याने ग्राम रोजगार सेवकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे. खामगाव तालुक्यातील ग्राम रोजगार सेवकांचे साधारणपणे ५ ते ३० हजार रूपयांपर्यत मानधन रखडले असल्याचे ग्राम रोजगार सेवक संघटनेचे तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर महाले यांनी सांगितले. दरम्यान अलीकडेच झालेल्या चर्चेनुसार येत्या १० तारखेपर्यंत रोजगार सेवकांच्या मानधनाचा मुद्दा मार्गी लागेल, असे संबंधित विभागाचे म्हणने असल्याचे सांगतानाच, जोपर्यंत मानधन प्रत्यक्ष खात्यात जमा होत नाही, तोपर्यंत याची श्वाश्वती देणे अवघड असल्याचेही महाले म्हणाले.

ग्राम रोजगार सेवकांच्या मानधनाचा प्रश्न लवकरच निकाली काढण्यात येईल. एक ते दोन दिवसात रक्कम खात्यात जमा करण्यात येईल.
-गौरव खोडके
सहाय्यक कार्यक्रम अधिकारी
म.गां. रा. ग्रा.रो.ह.यो., खामगाव.

एकीकडे तोकड्या मानधनावर काम करावे लागत असताना, आहे ते मानधन वेळेवर मिळत नसल्याने रोजगार सेवकांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
-ज्ञानेश्वर महाले, तालुकाध्यक्ष, ग्राम रोजगार सेवक संघटना.

Web Title: The question of Honorarium for village employment servants remains

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.