दरम्यान, चिखली येथे वास्तव्यास असलेल्या सराईत गुन्हेगार सय्यद समिर सय्यद जहीर (वय २२, रा. गोरक्षणवाडी) याच्यावर एमपीडीएअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनीही यासंदर्भातील अंतिम प्रस्तावावर स्वाक्षरी केल्याने या सराईत गुन्हेगाराला आता पुढील ११ महिने जिल्हा कारागृहात स्थानबद्धतेमध्ये (न्यायालयीन कोठडीत) काढावे लागणार आहेत. चिखली पोलीस ठाण्यांतर्गत त्याच्या विरोधात १९ गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. मालमत्तेसह शरीराविरुद्धचे हे गुन्हे आहेत. त्यामुळे चिखली परिसरात दहशत निर्माण करण्याचा ही व्यक्ती प्रयत्न करीत असल्याने त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करणे अनिवार्य होते. त्यानुषंगानेच त्याच्या विरोधात एमपीडीएने कारवाई करण्यात आली आहे. ९ सप्टेंबरला यासंदर्भातील आदेश जिल्हाधिकारी यांनी काढल्यानंतर त्याची जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. दरम्यान, तडिपारीच्या अन्य प्रस्तावीत प्रकरणांपैकी नेमक्या किती प्रकरणात उपविभागीय अधिकारी अनुकूलता दाखवितात याकडे सध्या लक्ष लागून राहले आहे.
--आठ वर्षांनंतर एमपीडीएची कारवाई--
बुलडाणा जिल्ह्यात एमपीडीएअंतर्गत तब्बल आठ वर्षांनंतर प्रथमच अशा स्वरुपाची कारवाई करण्यात आली आहे. एमपीडीए ॲक्ट म्हणजे महाराष्ट्र झोपडपट्टी दादा, हातभट्टीवाले, अैाषधी द्रव्यविषयक गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती यांच्या विघातक कृत्यांना आळा घालण्याचा कायदा होय. प्रामुख्याने १९९८ मध्ये अनुषंगिक कायद्यात सुधारणा करण्यात येऊन त्याची व्यापकता वाढविण्यात आली होती. पोलीस दलाकडून जिल्हाधिकारी यांच्याकडे अनुषंगिक प्रस्ताव जात असतो. त्यावर त्यांनी निर्णय घेतल्यानंतर पोलीस या अनुषंगिक कारवाई करीत असते.