घर बांधताना प्रत्येक गोष्ट निरखून खरेदी केली जाते. कुठलीही काटकसर नको. शिवाय, घर मजबूत आणि सुरक्षित असावे, म्हणून घरमालक मोठी किंमत मोजायला तयार असतात, असे असले तरी या घराला सुरक्षा प्रदान करणारे कुलूप मात्र स्वस्त दरातील खरेदी करण्यात येते. याचा फायदा चोरटे घेतात. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात घरफोड्या करणाऱ्यांचे प्रकार वाढले आहेत. लाखो रुपये किमतीचे घर चोरटे क्षणात फोडतात. याकरिता चोरट्यांकडून विविध तंत्रांचा वापर केला जातो. या तंत्रांपुढे घराला लावलेले कुलूप टिकत नाही. कुलूप कितीही मोठे असले तरी चोरट्यांना ते सहज तोडता येते. घराला असलेले हँडल आणि कडी चोरटे सहज तोडतात. याकरिता वापरले जाणारे साहित्य घरमालक अतिशय स्वस्त दरातले खरेदी करत असल्याचे दिसून येते. घराकरिता लाखो रुपये मोजणारी मंडळी कुलूप खरेदी करताना स्वस्तातील कुलूप कोणते आहे, याचाच शोध घेतात. यामुळे चोरट्यांना कुलूप तोडताना फारसा वेळ लागत नाही. यासंदर्भात बुलडाणा शहरातील काही कुलूप विक्रेत्यांकडून माहिती घेतली असता बहुतांश ग्राहक हे स्वस्तातील कुलुपाचीच मागणी करीत असल्याचे त्यांनी सांगितले. बाजारपेठेत साधे कुलूप सर्वाधिक लोकप्रिय आहे. या कुलुपाची किंमत १५ रुपयांपासून ते १००० रुपयांपर्यंत आहे. सर्वसाधारण ग्राहक ४० ते ८० रुपयांपर्यंत कुलूप खरेदी करतात. महागड्या कुलुपाकडे घरमालक चुकूनही पाहत नाहीत. मोर्टिस लॉक आणि राउंड पॅडलॉक खरेदी करणारे ग्राहक अगदी बोटावर मोजण्याइतकेच आहेत. या कुलुपांच्या किमती ग्राहकांच्या आवाक्याबाहेर आहेत. यामुळे विक्रेतेही अशी महागडे कुलुपे मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी ठेवत नाहीत. यामुळे लाखो रुपये किमतीचे घर तकलादू कुलुपांमुळे असुरक्षित झाले आहे.
घरफोडीच्या घटनांमध्ये १० टक्क्यांनी वाढ
बुलडाणा शहरात आठवडाभरामध्ये चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत. कोरोना संसर्गाच्या काळात जिल्ह्यात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून घरफोडीच्या घटनांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत १० टक्क्यांनी वाढ झाली आहे. विशेषत: रात्री घरफोड्या होण्याचे प्रमाण हे १७ टक्क्यांने वाढलेले आहे. जिल्हाभरात घरफोड्यांचे सत्र वारंवार घडत आहे. प्रत्येक तालुक्यात चोरट्यांनी घरांना लक्ष्य केले आहे. विशेष म्हणजे, अधिक तगडे घर चोरट्यांनी निशाण्यावर धरले आहे. यातील बहुतांश घरांमध्ये कुलूप तोडूनच चोरी झाली आहे.