मनुष्यबळाअभावी कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीची समस्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2020 11:37 AM2020-12-18T11:37:05+5:302020-12-18T11:39:39+5:30

Buldhana news मुख्य कालवे, अंतर्गत पाट, सऱ्यांच्या देखभालीसह निरीक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज असताना ५७ कर्मचाऱ्यांवर हा डोलारा उभा आहे.

Problems of maintenance and repair of canals due to lack of manpower | मनुष्यबळाअभावी कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीची समस्या

मनुष्यबळाअभावी कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीची समस्या

Next
ठळक मुद्देबुलडाणा जिल्ह्यात तीन मोठे, सहा मध्यम व ८१ लघू प्रकल्प आहेत.४९० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तेथे प्रत्यक्षात २१८ कर्मचारीच कार्यरत आहेत.

- नीलेश जोशी
लोकमत न्यूज नेटवर्क 
बुलडाणा: पेनटाकळी प्रकल्पाच्या कालव्याला भगदाड पडून शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याच्या पार्श्वभूमीवर पाहणी केली असता पाटबंधारे विभागाच्या सिंचन शाखेंतर्गत तब्बल ५६ टक्के पदे रिक्त असल्याने सिंचन सुविधांचा प्रत्यक्ष लाभ देण्यासोबतच कालव्यांच्या देखभाल दुरुस्तीची समस्या निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात स्थापित सिंचन क्षमता महत्तम पातळीवर उपयोगात आणण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे.
बुलडाणा जिल्ह्यात तीन मोठे, सहा मध्यम व ८१ लघू प्रकल्प आहेत. याप्रकल्पाच्या माध्यमातून जिल्ह्यात सिंचनासाठी प्राधान्य दिले जाते; मात्र यासाठी या विभागाकडे आवश्यक असलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याच कमी असल्याने समस्या निर्माण होत आहे. जेथे ४९० कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे तेथे प्रत्यक्षात २१८ कर्मचारीच कार्यरत आहेत तर ७५३ किमी लांबीच्या मुख्य कालवे, अंतर्गत पाट, सऱ्यांच्या देखभालीसह निरीक्षणासाठी आवश्यक मनुष्यबळाची गरज असताना ५७ कर्मचाऱ्यांवर हा डोलारा उभा आहे. वास्तविक टेल टू हेड या नियमाप्रमाणे पाणी दिले जाते. त्यानुषंगाने प्रत्यक्ष सिंचनाचा लाभ देण्यासाठी कालवा निरीक्षक, मोजणीदार, कालवा टपाली, कालवा चौकीदार या पदांची आवश्यकता आहे; मात्र ही पदेच रिक्त असल्याने समस्या आहेत. त्यामुळे यंदा पाण्याची उपलब्धता असूनही प्रत्यक्ष सिंचनासाठी त्याचा कितपत उपयोग होतो, असा प्रश्न आहे. पेनटाकळी प्रकल्पावरील कालव्याला भगदाड पडून शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने हा प्रश्न ऐरणीवर आला.


प्रकल्प हस्तांतरणाबाबतही अडचण
पेनटाकाळी प्रकल्पाचा कालवा फुटल्यानंतर या प्रकल्पाच्या हस्तांतरणासंदर्भातही बांधकाम विभाग आणि पाटबंधारे विभागामध्ये काही अडचणी असल्याचे समोर येत आहे. २००१ आणि २००८ च्या परिपत्रकाचा संदर्भ त्यास आहे. पेनटाकळी प्रकल्पही अद्याप निर्माणाधीन आहे. त्याची एक सुप्रमाही सध्या प्रलंबित आहे. तसेच प्रकल्पातून अद्याप महत्तमस्तरावर  सिंचन सुरू झालेले  नाही. १०० हेक्टर सिंचन निर्मिती अद्यापही बाकी असल्याचे सूत्रांनी सांगितले. याप्रकल्पावरून महत्तमस्तरावर १४,३३२ हेक्टर सिंचन क्षमता निर्माण होऊ शकते. सध्या ती १४,२३२ हेक्टरपर्यंत निर्माण झाली आहे.


पाच शाखांमध्ये पदभरती नाही
पेनटाकळी संदर्भाने उपविभागांतर्गत पाच शाखा कार्यालये सुरू झाली आहेत. मात्र त्या ठिकाणी आवश्यक असलेली पदभरती झालेली नाही. दप्तर कारकून, मोजणीदार, शिपाई, कालवा चौकीदार, कालवा निरीक्षकांसह अन्य अशी जवळपास ११० पदे येथे रिक्त आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक सिंचन क्षमता असलेल्या मेहकर तालुक्यातील ही स्थिती असेल तर अन्य तालुक्यांचा विचार न केलेला बरा.

Web Title: Problems of maintenance and repair of canals due to lack of manpower

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.