लोकमत न्यूज नेटवर्कबुलडाणा: कोरोनाच्या दुसऱ्या लाटनेने जिल्हा सध्या त्रस्त आहे. त्यातच कोरोना प्रतिबंधासाठी लावण्यात आलेले कडक निर्बंध, संचारबंदीमुळे आंतरजिल्हास्तरावर तथा जिल्ह्यांतर्गत नाकाबंदी लावण्यात आली आहे. त्यामुळे पोलीस दलावर पुन्हा एकदा कामाचा ताण आला आहे. त्यातच बुलडाण्यात गेल्या आठवड्यात राजकीय राड्याची आणखीनच भर पडली होती. अशा स्थितीत पोलिसांना कायम कर्तव्यावर हजर रहावे लागत असल्याचे एकंदरीत चित्र जिल्ह्यात आले. गेल्या १५ महिन्यांच्या कालावधीत फ्रंटलाईन वर्कर्स म्हणून काम करताना पोलिसांनी अत्यंत जोखमीच्या भागातही काम केले आहे. परिणामी जिल्ह्यातील तीन पोलीस सहकाऱ्यांना कोरोनामुळे त्यांचा जीव गमवावा लागला आहे तर आतापर्यंत पोलीस दलातील ३९५ पोलीस कर्मचारी व अधिकारी कोरोनाबाधित झाले आहेत. थोडक्यात तब्बल १४ टक्के पोलीस कर्मचारी, अधिकारी गेल्या १५ महिन्यात कोरोनाबाधित झाले आहे. सध्याही ६५ कर्मचारी व अधिकारी कोरोनाबाधित असून त्यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.१६ मार्च पासून जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधासाठी लसीकरण सुरू झाले आहे. फ्रंटलाईन वर्कर म्हणून पोलिसांनाही प्राधान्यक्रमाने कोरोनाची लस देण्यात आली. बुलडाणा जिल्ह्यात २,६०४ पोलीस कर्मचारी आणि १८८ पोलीस अधिकारी आहेत. यापैकी पहिला डोस ८७ टक्के पोलीस कर्मचाऱ्यांना देण्यात आला असून लसीचा दुसरा डोस आतापर्यंत ५३ टक्के पोलिस कर्मचाऱ्यांना देण्यात आला आहे. अद्यापही १३ टक्के पोलीस कर्मचाऱ्यांचे लसीकरण झाले असून टप्प्याटप्प्याने ते होत आहे.
बाबा, आम्ही घरी वाट पाहताेय......!
माझे बाबा पोलीस आहेत. गेल्या वर्षभरापासून रात्री-बेरात्रीही त्यांना कामावर जावे लागते. प्रत्यक्ष फिल्डवर ते राहत असल्याने आम्हाला कोरोना होईल या भीतीने ते आमच्या जवळही येत नाही. माझे आजोबाही मध्यंतरी वारले. दोन दिवसांची त्यांची तेरवी आहे. या स्थितीतही माझे बाब कर्तव्यावर गेले. ते घरी येण्याची मी नेहमीच आतुरतेने वाट पाहतो.प्रफुल्ल सुनील दळवी, बुलडाणा
माझे बाबा बुलडाणा पोलीस शहर ठाण्यात कार्यरत आहेत. शहरातील कायदा व सुव्यवस्थेबाबतची त्यांना बारिकसारीक माहिती ठेवावी लागते. नेहमीच ते कामात असतात. त्यामुळे आम्हाला वेळ ही त्यांना देता येत नाही. कोरोनामुळे या समस्या निर्माण झाल्या आहेत.हर्षल गजानन लहासे, बुलडाणा
जिल्हा मुख्यालयामध्ये माझे बाबा काम करतात. कोरोनाच्या बंदोबस्तामुळे त्यांची घरी येण्याची निश्चित अशी वेळ नाही. ते केव्हा घरी येतील याची आम्ही आतुरतेने वाट पाहात असतो.प्रज्वल रवींद्र डुकरे