चिखली : शहरात व परिसरात काेराेनाचा उद्रेक झाला असून रुग्ण संख्या माेठ्या प्रमाणात वाढत आहे़ त्यामुळे चिखली शहरातील सर्वच रुग्णालय व काेविड केअर सेंटर यामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येत आहे़ रूग्णालयात जागा नसल्यामुळे नुकतीच लागण झालेल्या रुग्णांना औषधोपचार करून डॉक्टर घरीच विलगीकरणात ठेवत आहेत़
चिखली शहर व तालुक्यात गत काही दिवसांपासून काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ गावापर्यंत काेराेना पाेहचल्याने सर्वसामान्य त्रस्त झाले आहेत़ काेराेनाची लागण झाल्यानंतर त्यावरील उपचारासाठी रुग्णांना माेठ्या प्रमाणात खर्च करावा लागत आहे़ हा खर्च गरीब रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा असल्याचे चित्र आहे़ काेराेनामुळे सर्वसामान्यांचे आर्थिक नियाेजन बिघडले आहे़ काही मेडिकल स्टोअरमध्ये औषधी छापील किमतीत विकल्या जात आहेत़ सामान्य रुग्णांना या विषयी काही माहिती नसल्यामुळे संगणीकृत याप्रमाणे पैसे मोजावे लागतात़ अगोदरच कोराेनाच्या भीतीमुळे रुग्ण व त्याचे नातेवाईक घाबरलेल्या असतात़ रयत क्रांती संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत ढोरे पाटील यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून रुग्णांना ना नफा ना तोटा या तत्वावर रुग्णापर्यंत औषधी पोहोचविण्याचा मानस व्यक्त केला आहे़ कोराेना रुग्णावर उपचार करण्यासाठी लागणाऱ्या सर्व प्रकारच्या औषधी ना नफा ना तोटा या तत्त्वावर रुग्णालयात रुग्णापर्यंत पोहोचण्याचा आमचा मानस असल्याचे प्रशांत ढोरे पाटील यांनी सांगितले़